Nana Patole : …तर मला आक्रामक भूमिका घ्यावी लागेल; नाना पटोले यांनी सरकारला दिला इशारा

भंडारा : कृषी पंपांना रात्रीचा वीजपुरवठा होत असल्याने, शेती पिकांना पाणी देण्याकरिता गेलेल्या डाकराम देशमुख या शेतकऱ्याचा वाघाने हल्ला करून बळी घेतला होता. ही घटना भंडाऱ्याच्या खैरीपट येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. घटनेनंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी खैरीपट गावातील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकरी कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
यावेळी नाना पटोले यांनी नरभक्षी वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा पटोले यांनी दिला. नाना पटोले यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, लाखांदूर तालुक्यातील खैरी/पट येथे वाघाच्या हल्ल्यात डाकराम देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन व्यक्त केले आणि त्यांच्या दुःखात सहभागी झालो.
गेल्या ४ महिन्यांपासून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सातत्याने आवाज उठवला, मात्र सरकारच्या उदासीनतेमुळे आवश्यक ती पावले उचलली गेली नाहीत, आणि त्याचा परिणाम म्हणून आज एका निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागला. वारंवार होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तातडीने प्रभावी उपाययोजना राबविणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.





