“…तर मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार”, नोटांच्या बंडलसह व्हिडिओ समोर येताच ‘त्या’ आमदाराचे दानवेंना चॅलेंज

MLA Mahendra Dalavi | ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मिडियावर तीन व्हिडिओ शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यात पैशांसह आमदार दिसत असल्याचे त्यांनी आरोप करत, सरकारकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, मग इतके पैसे कुठून आले, असा सवाल अंबादास दानवे केला आहे. या व्हिडिओत दिसणारे आमदार शिंदेसेनेचे महेंद्र दळवी आहेत. मात्र या व्हिडिओशी माझा संबंध नसल्याचे महेंद्र दळवी यांनी सांगत संताप व्यक्त केला.
या व्हिडीओत महेंद्र दळवी व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसत आहे. ते बॅगेतून एकापाठोपाठ बंडलं काढून टेबलवर ठेवताना दिसत आहेत. मात्र आमदार महेंद्र दळवी यांनी हा व्हिडीओ मॉर्फ केल्याचे म्हणत सर्व आरोप फेटाळले आहेत.
‘ब्लॅकमेल करणे हा अंबादास दानवे यांचा धंदा’
एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना महेंद्र दळवी म्हणाले, “अंबादास दानवे सुपारीबाज नेता आहे, त्यांना कोणी सुपारी दिली हे सांगावे. अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पोस्ट करावा. त्यात दिसणारा लाल टीशर्टवरील व्यक्ती कोण आहे त्याचा चेहरा दाखवावा. कुणाला तरी ब्लॅकमेल करणे हा अंबादास दानवे यांचा धंदा आहे. विरोधी पक्षनेते असताना त्यांनी काय केले हे महाराष्ट्राने पाहिले आहे. आता त्यांच्याकडे कुठले पद नाही. पक्षातही कुणी विचारत नाही. ब्लॅकमेल करणं हा अंबादास दानवेंचा धंदा आहे.”
“अंबादास दानवेंकडे कोणतं काम नाही, पद नाही, पक्षात त्यांना कोणी कुत्रं विचारत नाही. कोणीही दानवे यांना गांभीर्याने घेत नाही. अंबादास दानवेंनी तो व्हिडीओ नीट दाखवावा. लाल टीशर्टमधील व्यक्ती कोण, हे त्यांनी सांगावे. त्या पैशाच्या गड्ड्यांसमोर जर मी दिसलो तर आमदारकीचा राजीनामा देईन. तो व्यक्ती कोण हे लोकांसमोर आले पाहिजे. या व्हिडिओची सत्यता नाही. निवडणुकीतही असे प्रकार त्यांनी केले. अंबादास दानवे यांच्याकडे पुरावे असतील तर कुठल्याही चॅनेलवर चर्चेसाठी यावे. मी समोर चर्चा करायला तयार आहे,” असेही चॅलेंज आमदार महेंद्र दळवी यांनी दानवे यांंना दिले.
‘पुराव्यासोबत दानवेंनी पुढे यावे’
दरम्यान, “अधिवेशन काळात हा जो प्रकार त्यांनी केला हा केवळ बदनामी करण्यासाठी आहे. याच्यामागे कुणीतरी वेगळी शक्ती आहे. जी आम्हाला आणि पक्षाला बदनाम करण्याचं काम करत आहे. विधानसभेत हा प्रश्न मी उपस्थित करणार आहे. पुराव्यासकट दानवेंनी पुढे यावे,” असंही महेंद्र दळवी यांनी अंबादास दानवे यांना सांगितले. मात्र दळवी यांनी सातत्याने त्या व्हिडीओमधील व्यक्ती मी नसल्याचे सांगितल्याने अद्यापही संभ्रम कायम आहे. Ambadas Danve |
हेही वाचा:





