Rupali Chakankar : ….तर निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल; अत्याचाराच्या घटनांमध्ये तुतारी गटाचे पदाधिकारी पुढेः रुपाली चाकणकरांचा गंभीर आरोप

पुणेः राज्यात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कालच मुंबईतील बलात्काराच्या वेगवेगळ्या घटनांमुळे महाराष्ट्र हादरला. यामुळे महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना रोखण्यात महिला आयोग अपयशी ठरत असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. तसेच महिला आयोग बरखास्त करावा अशी देखील मागणी केली जात आहे. या टीकेवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाष्य केले आहे.
कोणत्याही भागात महिलांवर अन्याय अत्याचाराची घटना घडल्यावर महिला आयोग तातडीने याची दखल घेत आहे. हे राज्यातील जनतेला माहित आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीवर विश्वास दाखवित विरोधकांना घरीच बसवले आहे. त्यामुळे विरोधकांकडे टीका करणे हा एककलमी कार्यक्रम असल्याचे विरोधकांच्या टीकेला उत्तर रुपाली चाकणकर यांनी दिले आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर असताना चाकणकर यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांनी प्रतिक्रिया दिली.
…तर निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल
कुरारमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरून विरोधक आरोप करीत आहेत. पण त्या घटनेमधील आरोपी हा तुतारी गटाचा वार्ड अध्यक्ष असल्याचा गंभीर आरोप करीत अत्याचाराच्या घटनांमध्ये तुतारी गटाचे पदाधिकारी फार पुढे असल्याचे समोर आल्याचे रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन समाजामध्ये कसे वावरायचे याबाबत धडे दिले तर निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल, अशा खोचक शब्दांत रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.
विद्या चव्हाण यांना खोचक टोला
शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण यांच्यावर देखील चाकणकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. विद्या चव्हाण यांचे मला आश्चर्य वाटते. त्या महिला अत्याचाराबाबत बोलतात. यांनी स्वतःच्या सुनेचा छळ केल्याचे जनतेला माहिती आहे. महिला अत्याचार, कौंटुबिक हिंसाचाराच्या बाबात बोलत असेल, तर याच्यासारख दुसरे दुर्देव असूच शकत नसल्याची खरमरीत टीका चाकणकर यांनी केली आहे. तसेच त्यांनी स्वतः आत्मपरीण करावे, असा खोचक टोला देखील चाकणकर यांनी लगावला आहे.





