पुणे शहरातील गुजराती समाजाचे कार्य अभिमानास्पद – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

पुणे – पुण्यभूमीत अडीच लाख चौरस फुटांची देखणी आणि सुसज्ज वास्तू गुजराती समाजाच्या एकोप्यातून उभी राहिली, ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. कोणत्याही सामाजिक भवनात अशा प्रकारच्या सोयीसुविधा असलेली ही पहिलीच वास्तू म्हणावी लागेल.
गेल्या ११२ वर्षांपासून श्री पूना गुजराती बंधू समाज ही संस्था सातत्याने पुण्याच्या समाजजीवनात एकरूप होऊन भरीव कार्य करीत आहे. गुजराती समाज हा मुळतः संघर्ष आणि वादविवाद यापासून दूर असल्याने तो देशात आणि देशाबाहेर देखील सर्वत्र सहजपणे एकरूप होतो आणि सहज स्वीकारला देखील जातो, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
कोंढवा येथे श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या जयराज स्पोर्ट्स अॅंड कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन गृहमंत्री शहा यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, श्री पूना गुजराती बंधू समाजाचे अध्यक्ष नितीन देसाई, श्री पूना गुजराती बंधू समाजच्या जयराज स्पोर्ट्स अॅंड कन्व्हेन्शन सेंटरचे कार्यकारी संचालक राजेश शहा, नैनेश नंदू. जयंत शहा, राजेंद्र शहा, वल्लभ पटेल, सुजय शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
अमित शहा म्हणाले की, संपूर्ण देशामध्ये पुणे शहर हे ध्यान, तप, राष्ट्रवाद, सामाजिक चेतना यासाठी सुपरिचीत आहे. स्वातंत्र्य लढ्याचा विचार आणि कृतीशीलतेचे नेतृत्व करण्याचे काम पुण्याने केले आहे. मुघलांशी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेतून देशात हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.
येथूनच स्वातंत्र्य लढ्याची ज्योत वेगाने तेजोमय झाली. यावेळी श्री पूना गुजराती बंधू समाजचे अध्यक्ष नितीन देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक श्री पूना गुजराती बंधू समाजच्या जयराज स्पोर्ट्स अॅंड कन्व्हेन्शन सेंटरचे कार्यकारी संचालक राजेश शहा यांनी केले.
गुजराती समाज समरस, एकरूप…
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रकल्पाचे उद्घाटन करतात, त्या प्रकल्पाची भरभराट होते, हा आजवरचा इतिहास आहे. मोदींनी भूमिपूजन केलेल्या आणि अमित शहा यांनी लोकार्पण केलेल्या श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या जयराज स्पोर्ट्स अॅंड कन्व्हेन्शन सेंटर या प्रकल्पाचे भविष्य उज्ज्वल आहे. महाराष्ट्राच्या विकासात गुजराती समाजाचे मोठे योगदान असून महाराष्ट्राच्या संस्कृतीत गुजराती समाज समरस आणि एकरूप होऊन गेला आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमात नमूद केले.
गुजराती समाजाने सर्वार्थाने योगदान…
गुजराती समाजामुळे महाराष्ट्राची तिजोरी सशक्त होत आहे. गुजराती समाज हा व्यापाराच्या माध्यमातून केवळ पैसा कमवत नाही, तर आपले समाजाचे ऋण लक्षात घेऊन सर्व जाती-धर्माच्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. कोविड काळात या समाजाने भरभरून केलेली मदत आणि दान यामुळे आपण त्या समस्येचा सामना करू शकलो. महाराष्ट्राच्या प्रगतीत गुजराती समाजाने सर्वार्थाने योगदान दिले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
फोटो –
कोंढवा : जयराज स्पोर्ट्स अॅंड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटनावेळी गुजराती समाजाच्या वतीने अमित शहा यांच्या सन्मान करण्यात आला. यावेळी (डावीकडून) मुरलीधर मोहळ, एकनाथ शिंदे, नितीन देसाई, शहा, अजित पवार, राजेश शहा, नैनेश नंदू.





