Veerappa Moily : मोदींना तुरुंगात जाण्यापासून काॅंग्रेसने वाचवले; वीरप्पा मोइली यांचे मोठे वक्तव्य
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय कायदामंत्री वीरप्पा मोइली (Veerappa Moily) यांनी एका वादग्रस्त वक्तव्यात म्हटले आहे की, यूपीए सत्तेत असताना त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी नरेंद्र मोदींना तुरुंगात जाण्यापासून वाचवले.

Veerappa Moily : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय कायदामंत्री वीरप्पा मोइली (Veerappa Moily) यांनी एका वादग्रस्त वक्तव्यात म्हटले आहे की, यूपीए सत्तेत असताना त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी नरेंद्र मोदींना तुरुंगात जाण्यापासून वाचवले. मी कायदामंत्री असताना आमच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींना तुरुंगात जाण्यापासून वाचवले. त्यामुळे काँग्रेसला नुकसान होत आहे. काँग्रेस मोदींना सत्तेत येण्यापासून रोखू शकली असती, असे मोईली यांनी म्हटले आहे.
वीरप्पा मोइली (Veerappa Moily) एका कार्यक्रमात म्हणाले, न्यायालयाने अमित शाह यांना त्यांच्या गृहराज्य गुजरातमधून हद्दपार केले आणि खटलाही दुसऱ्या राज्यात वर्ग केला. तुरुंगात जाणारे अमित शाह हे पहिले व्यक्ती होते आणि त्यानंतर नरेंद्र मोदींची पाळी होती. त्यांनाही तुरुंगात जावे लागले असते आणि राज्यातून हद्दपार व्हावे लागले असते. पण आता हीच काॅंग्रेस पक्षाची शोकांतिका ठरली आहे.
नरेंद्र मोदींविरुद्धचा तपास काॅंग्रेसमध्येच थांबवण्यात आला. हे यूपीए सरकारच्या काळात घडले आणि ते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामुळे नव्हे, तर इतर नेत्यांमुळे घडले. मोइली असेही म्हणाले की, जर पक्षातील काही नेत्यांनी जैसे थे स्थिती कायम ठेवण्यासाठी अडथळा आणला नसता, तर काँग्रेसने नरेंद्र मोदींना सत्तेवर येण्यापासून रोखले असते.
हे वादग्रस्त विधान करताना वीरप्पा मोइली यांनी ज्या काँग्रेस नेत्यांचा उल्लेख केला होता, त्यांची नावे घेतली नाहीत. यूपीए सरकारच्या काळात झालेल्या तपासासंदर्भातील घटनांचा आढावा घेतल्यानंतर त्यांचे हे विधान आले आहे.
कोण आहेत वीरप्पा मोईली?
वीरप्पा मोइली (Veerappa Moily) यांनी नोव्हेंबर १९९२ ते डिसेंबर १९९४ या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. मुख्यमंत्री होण्यापूर्वी, ते कर्नाटकातील कारकाला मतदारसंघातून सहा वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. यूपीए-२ मध्ये, मोइली यांनी कायदा आणि न्याय मंत्री (२००९-२०११), कॉर्पोरेट व्यवहार मंत्री (२०११-२०१२), ऊर्जा मंत्री (२०१२), पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री (२०१२-२०१४) आणि पर्यावरण आणि वन मंत्री (२०१३-२०१४) म्हणून काम पाहिले.






