पुणे जिल्हा | जुन्नर टुरिझम डेस्टिनेशन मॅनेजमेंटचे काम शाश्वत

जुन्नर, (वार्ताहर) – जुन्नर टुरिझम डेस्टिनेशन मॅनेजमेंटचे काम हे शाश्वत असून अत्यंत उल्लेखनीय आहे, असे मत जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी मांडले पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन आणि जुन्नर टुरिझम डेस्टिनेशन मॅनेजमेंट यांच्या माध्यमातून जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत नुकताच शिवजन्मभूमी शाश्वत पर्यटन जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावरील चित्र प्रदर्शन, ऐतिहासिक नाणी प्रदर्शन, जुन्नर रेस्क्यू टीम, वनविभाग जुन्नर अशा विविध प्रकारच्या स्टॉलचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते.
महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती पुढे चालविण्याच्या दृष्टीनेअस्सल महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील या ठिकाणी लावण्यात आले होते.
वारली पेंटिंग, पाथरवट बांबूपासून साहित्य बनवणे अशा विविध बाबींचे स्टॉलनी पर्यटकांचे लक्ष वेधले होते. याप्रसंगी किल्ले शिवनेरीचा माहितीपट देखील प्रकाशित करण्यात आला.
शिवजन्मभूमी शाश्वत पर्यटन सत्राचे उद्घाटन जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले तर माझा शिवनेरी या शिवनेरी किल्ल्याच्या माहितीपटाचे प्रकाशन विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जवळपास 15 ते 16 हजार पर्यटकांनी भेट दिली. किल्ले शिवनेरीच्या माहितीपट पाहिल्यानंतर अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी जुन्नर टुरिझम डेस्टिनेशन मॅनेजमेंटचे भरभरून कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनात पर्यटन विभागाबरोबरच जुन्नर टुरिझमच्या चेतन पारखे, विलास कडलाक, जितेंद्र देशमुख, विनायक खोत, सतीश नाईक, विनायक लोखंडे, महेश शेटे,जयंत पारखे यांनी मोलाचे योगदान दिले.





