पुणे जिल्हा | आम्ही पवारांच्या विचारांचे पाईक

नारायणगाव, (वार्ताहर) – राष्ट्रवादीचे आम्ही सर्व कार्यकर्ते ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांच्या विचारांचे पाईक असून त्यांच्याच विचारांचा वसा आणि वारसा घेऊन पुढे जाणार असल्याचे युवानेते अमित बेनके यांनी सांगितले.
जुन्नर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार आमदार अतुल बेनके सोमवारी (दि. 28) सकाळी दहा वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील व अनेक कार्यकर्ते, महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे बेनके यांनी सांगितले.
आमदार अतुल बेनके म्हणाले की, जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यातील रस्ते, पाणी, पर्यटन, आरोग्य सुविधा, शेतकरी, युवक व युवती, तालुक्यातील किल्ले, करोना काळात केलेले काम,
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांना मिळवून दिलेला आर्थिक लाभ, धार्मिक स्थळांचा विकास, तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणीपुरवठा करणार्या योजना यासारखी अनेक विकासाची कामे केली आहे.
त्यामुळे तालुक्यातील जनतेचा मी केलेल्या कामांवर विश्वास असून मला विधानसभा 2024 च्या निवडणुकीत मतदान करून आशीर्वाद देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाण्यासाठी संघर्ष… ( या चौकटीत आमदार अतुल बेनेकेंचा फोटो घेणे)
जुन्नर विधानसभा निवडणुकीत महायुतीतील सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असून निवडणुकीत मला यश मिळेल याची खात्री आहे.
स्व. वल्लभ बेनके यांनी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी केलेले काम जनतेसमोर असून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांची अपुर्ण राहिलेली विकासकामे पूर्ण करणार आहे. तालुक्यातील पाणीप्रश्नासाठी कितीही संघर्ष करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असे आमदार अतुल बेनके यांनी स्पष्ट केले.





