पुणे जिल्हा | भावनेचा आधार घेणार्यांना जनतेकडून माफी नाही

जुन्नर, (वार्ताहर) – जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील अनेक जण उभे आहेत. परंतु तालुक्यातील जनतेसाठी विरोधकांनी काय केले? मला कोणाला हरवायचे नाही तर मला जुन्नर तालुक्याला जिंकायचे आहे.
आम्ही दिवस-रात्र जनतेच्या विकासाची कामे केली आहे. विरोधक भावनेचा आधार घेऊन निवडणूक लढवणार असाल तर जुन्नर तालुक्यातील जनता कधीही माफ करणार नाही, असे महायुतीचे अधिकृत उमेदवार (अजितदादा) आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.
जुन्नर विधानसभा मतदार संघाचे महायुती मार्फत राष्ट्रवादी काँग्रेस अधिकृत उमेदवार म्हणून आमदार बेनके यांनी सोमवारी (दि. 28) उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर धान्यबाजार येथे झालेल्या सभेत आमदार बेनके बोलत होते.
यावेळी सयाजी शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, पांडुरंग पवार, पापा खोत, युवा नेते अमित बेनके, रोहिदास केदारी, उज्ज्वला शेवाळे, भाऊ कुंभार, रामदास अभंग, गणेश वाजगे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार बेनके म्हणाले की, जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीत पाच वर्षांपूर्वी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून बहुसंख्य मताने निवडून दिले तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी पाच वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली. चिल्हेवाडीच्या पाइपलाइनसाठी 100 कोटी मंजूर केले. स्व. वल्लभ बेनके यांच्या काळातील आणि त्यांच्या मनातील तालुक्याच्या विकासाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे काम केले.
मागील निवडणुकीत बोलल्याप्रमाणे बिरसा मुंडा यांचे स्मारक उभे करत नाही तोपर्यंत पुढच्या निवडणुकीला सामोरे जाणार नाही, असे सांगितले होते. आता स्मारक उभे आहे. आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे व तालुक्यातील महामानवांसाठी काम केले. मुस्लीम समाजाला निधी दिला. बौद्ध समाजासाठी विकासाचीकामे केली. जुन्नर तालुक्याच्या पाण्याचे रक्षण केले.
1 हजार 37 लाडक्या बहिणी
जुन्नर तालुक्याचा सेवक म्हणून काम करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या राज्याची शिकवण दिली त्याचा अंगीकार केला. जुन्नर तालुका सुसंस्कृत होण्यासाठी आहोरात्र कष्ट करणार्या वारकरी संप्रदायाला मदत केली. बेनके कुटुंबाला वारकरी संप्रदायाने फार मोठी साथ दिली. 1 लाख 1 हजार 37 महिलांना माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत आर्थिक निधी मिळवून दिला.
आमदार अतुल बेनके यांनी मागील पाच वर्षांत तालुक्यातील गावागावांत विकासकामे केलेली आहेत. कृषी क्षेत्रात क्रांती केलेला तसेच राज्यातील पहिला पर्यटन तालुका म्हणून या तालुक्याचे नाव राज्यात चर्चेत आहे.
मतदारसंघाचा विकास काय असतो हे मागील तीन वर्षांत आमदार बेनके यांनी विकासकामे करून दाखवून दिले आहे. पाणीदार आमदार म्हणून त्यांनी आपली ओळख कामातून करून दिलेली असून हिरडा कारखाना, बिबट सफारी, कुकडेश्वर मंदिर निधी या मोठ्या प्रकल्पांकरिता भरीव निधी शासनाकडून मंजूर करून आणला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील, अध्यक्ष, म्हाडा, पुणे




