पुणे जिल्हा | जुन्नरमध्ये आता प्रशासकीय कामे एकाच छताखाली

जुन्नर (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यामधील नागरिकांची विविध प्रशासकीय कामे एकाच इमारतीमध्ये होण्याकरिता सुमारे 38 कोटी शासकीय निधी खर्च करण्यात येऊन जुन्नर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नवीन प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे.
यामध्ये 10 हजार चौ. मी. बांधकाम होणार असून यात वाहनतळ, विविध शासकीय विभागांची कार्यालये, उपहारगृह, बहुउद्देशिय सभागृह असणार आहे.
आधुनिक पद्धतीने इतर सोई-सुविधा या इमारतीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आगामी दोन वर्षांत या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना सर्व शासकीय विभागातील कोणत्याही मध्यस्थांशिवाय एजंटगिरी न करता मिळणे गरजेचे असल्याचे मत आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले.
जुन्नर येथे नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचे भूमिपूजन आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते सोमवारी (दि. 14) संपन्न झाले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष श्याम पांडे, सुनील मेहेर, मुख्याधिकारी संदीप भोळे, नायब तहसिलदार सारिका रासकर,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे केशव जाधव,गोरक्षनाथ आगळे, उज्वला शेवाळे, फिरोज पठाण, भाऊ कुंभार, सुनील ढोबळे, गणेश महाबरे, नंदू तांबोळी, भूषण ताथेड, धनेश संचेती, जमीर कागदी आदींसह शहरातील नागरिक उपस्थित होते.
जुन्नरमधील जुना सरकारी दवाखाना प्रांगणात नव्याने बांधलेल्या स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी अभ्यास केंद्राच्या इमारतीचे तसेच माणिकडोह चौक येथील नव्याने बांधलेल्या स्वराज्य संकल्पक श्रीमंत शहाजीराजे भोसले प्रवेशद्वाराचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
या ऐतिहासिक धाटणीच्या प्रवेशद्वारामुळे जुन्नरच्या सौंदर्यात भर पडली असून येत्या काही दिवसात येथील परिसर सुशोभित करण्यात येणार आहे असेही आमदार बेनके म्हणाले.
कल ओळखून क्षेत्र निवडा
जुन्नरमध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका इमारतीमध्ये स्पर्धा परीक्षांकरिता लागणारी आवश्यक पुस्तकांकरीता 10 लाखांचा निधी आवश्यक फर्निचर येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शैक्षणिक क्षेत्रात आपला कल ओळखून क्षेत्र निवडावे त्याचप्रमाणे पारंपरिक वाचन संस्कृती आत्मसात, करा असे आवाहन आमदार अतुल बेनके यांनी केले.





