Women’s Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक म्हणजे निवडणूक जुमला; काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली – मोदी सरकारने मांडलेल्या महिला आरक्षण विधेयकाचा उल्लेख कॉंग्रेसने निवडणूक जुमला अशा शब्दांत केला. तसेच, देशातील कोट्यवधी महिला-मुलींच्या आकांक्षांबाबत खूप मोठा विश्वासघात करण्यात आल्याचे टीकास्त्रही सोडले.
कॉंग्रेसच्या वतीने ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली. निवडणूक जुमल्यांच्या मोसमात महिला आरक्षण विधेयक म्हणजे सर्वांत मोठा जुमला आहे.
मोदी सरकारने 2021 या वर्षात होणारी जनगणना अजूनपर्यंत केलेली नसल्याचा विषय आम्ही आधीपासूनच मांडत आहोत. जनगणना करण्यात अपयशी ठरलेला भारत हा जी-20 गटातील एकमेव देश आहे.
जनगणनेनंतरच महिला आरक्षण लागू होईल, असे सांगितले जात आहे. ती जनगणना होणार कधी? जनगणना आणि त्यानंतर मतदारसंघ फेररचना झाल्यावरच महिला आरक्षण अंमलात येईल असे विधेयकात नमूद करण्यात आले.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी जनगणना आणि मतदारसंघ फेररचना होईल का, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. विधेयक केवळ आजची हेडलाईन बनवण्यासाठी आहे. त्याची अंमलबजावणी खूप नंतर होऊ शकते. हे केवळ इव्हेंट मॅनेजमेंट आहे, असा शाब्दिक टोलाही रमेश यांनी लगावला.





