नवी दिल्ली, – करोनाचा विषाणू आपले स्वरूप बदलत असल्याचे गेल्या काही काळात आढळून आले आहे. केवळ लसीकरणाचा वेग वाढवूनच आपण विषाणू परिवर्तनाच्या या प्रकाराला आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामांना आळा घालू शकतो असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख संशोधक सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या की करोनाचा प्रसार वाढतो आहे. संपूर्ण जगात लसीकरण झाल्याशिवाय आपण सुरक्षित झाल्याचे म्हणता येणार नाही. मात्र त्यासाठी बराच काळ जाणार असून तेव्हाच समूह प्रतिकार शक्ती विकसित होणार आहे. त्यामुळे प्रत्येक देशाने आपापल्या स्तरावर युध्दपातळीवर प्रयत्न करून करोनाचा प्रसार रोखण्याचे आणि लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. गेल्या काही काळापासून करोनाचा सगळ्यांनाच त्रास झाला आहे. त्यामुळे लोक कंटाळले आहेत. त्यांना आता बाहेर जायचे आहे अन मोकळेपणाने फिरायचे आहे. सगळे पूर्वीसारखे सामान्य व्हावे अशी त्यांची अपेक्षा आहे. पण अद्याप तसे होत नसल्याने त्यांच्यात संतापाची भावना आहे. त्यामुळे करोनाचा प्रसार रोखण्यासाठी आपण काय मदत करू शकतो याचाही विचार केला जाण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.