कराडसह जिल्ह्यात एसटीची चाके थांबली

कराड – राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहक व इतर कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे कराड आगारासह जिल्ह्यात एसटीची वाहतूक ठप्प झाली आहे.
एसटी कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, सरकारने अपेक्षित वेळेत तोडगा न काढल्याने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे कराड आगारातील एकही एसटी बस मंगळवारी सकाळपासून बसस्थानकाबाहेर न पडल्याने प्रवासी, चाकरमानी व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली.
चालक-वाहक व अन्य कर्मचार्यांनी मंगळवारी सकाळी कराड बसस्थानकाबाहेर ‘कामगार एकजुटीचा विजय असो’ अशी आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली. राज्यातील इतर सर्व आगारांमधील कर्मचारी या आंदोलनात टप्प्याटप्प्याने सहभागी होतील, असे कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
दरम्यान, एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजला जात आले नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. विद्यार्थी आणि प्रवाशांना खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला.





