नारायणगाव : देशाची अर्थ संपत्ती मोजक्या धनदांडग्याच्या हातात एकवटत असल्याचा घणाघात केंद्रसरकारवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर केला. सरकारवर विश्वास ठेवायचा कसा असा प्रश्न विचारून डॉ. कोल्हे यांनी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आकडे कधी खोटे बोलत नसल्याचे म्हटले होते, त्याचाच धागा पकडून सरकार केवळ आर्थिक वाढीचे आकडे सांगते पण दरडोई उत्पन्नावर बोलत नाही. अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर पोहोचते असे जेव्हा म्हणता तेव्हा दरडोई उत्पन्नामध्ये जगात आपण 141 क्रमांकावर आहोत हे विसरून चालणार नाही याची जाणीव करून दिली. सरकारची कार्यपद्धती बघितली तर सरकारच्या विरोधात बोलू नका, निवडणुका वगळता देशाची परिस्थिती बघू नका आणि विरोधी पक्षनेत्यांची तोंड बंद करा अशी दिसून येते. जुन्नरच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मृत्यूला केंद्र सरकारचे कांद्याबाबतचे चुकीचे निर्यात धोरण कारणीभूत आहे. केंद्र सरकार सातत्याने किसान सन्मान निधीचा उल्लेख करते, परंतु किटकनाशके आणि खतांच्या किंमतीत 4 ते 5 पटीने वाढ झाली यावर बोलत नाही. गेली चार ते पाच वर्षे टोमॅटोला दर मिळत नसल्याने शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकत होता, तेव्हा सरकार शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला बांधावर आलं नाही. त्यामुळे सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असा जळजळीत सवाल डॉ. कोल्हे यांनी केला.