Vladimir Putin | Narendra Modi – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात आज शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेच्या निमित्ताने भेट झाली. दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंधांसह अन्य प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. युक्रेनमधील युद्ध लवकरात लवकर समाप्त व्हावे, ही मानवतेची गरज आहे, असे पंतप्रधान मोदींनी पुतीन यांना यावेळी सांगितले. युक्रेन युद्ध समाप्त करणे आणि तेथे शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने अलिकडच्या काळात करण्यात आलेल्या सर्व प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. या अनुषंगा सर्व संबंधितांकडून विधायक पावले उचलतील, अशी आशाही पंतप्रधानांनी पुतीन यांच्याबरोबरच्या चर्चेपुर्वी टिव्हीवरून केलेल्या प्रारंभिक निवेदनामध्ये म्हटले आहे. हा संघर्ष लवकरात लवकर समाप्त व्हावा आणि स्थायी शांततेसाठीता तोडगा काढण्यात यावा, असेही मोदी म्हणाले. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे भारतातील दौऱ्यादरम्यान स्वागत करण्यास भारत उत्सुक असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. पुतीन डिसेंबर महिन्यात बारत दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या समवेत त्यांची शिखर बैठक होणार आहे. भारत आणि रशियाने अवघड प्रसंगी नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे. भारत आणि रशियादरम्यानचे जवळचे संबंध जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, असेही पंतप्रधान मोदींनी पुतीन यांच्या बरोबरच्या चर्चेपुर्वी केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.