Pune District : कळस परिसरात पावसाची प्रतीक्षा कायम
Pune District : दिवसभर आकाशात ढगांची दाटी होते; मात्र सायंकाळच्या वेळी हेच ढग पाऊस न पाडता निघून जातात.

कळस : गेल्या काही महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे कळस (ता. इंदापूर) व परिसरातील शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शेतातील उभी पिके पाण्याअभावी करपून जाण्याच्या मार्गावर असून, दिवसभरातील कडक ऊन आणि वाऱ्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. रात्रीच्या वेळी दवबिंदू पडत असले, तरी त्याचा पिकांना काहीही फायदा होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
पावसाळ्याचा कालावधी संपत आला तरी परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. दिवसभर आकाशात ढगांची दाटी होते; मात्र सायंकाळच्या वेळी हेच ढग पाऊस न पाडता निघून जातात. पावसाच्या या हुलकावणीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, आगामी काळात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वेळेवर पाऊस न झाल्यास कळस परिसरात पिण्याच्या पाण्यासह पाणीटंचाई, धान्यटंचाई आणि चाराटंचाई अशा तिहेरी संकटाला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. खरीप हंगाम वाया गेल्यास शेतकऱ्यांच्या हाताला उत्पन्नाचा कोणताही स्रोत उरणार नाही. याचा थेट परिणाम स्थानिक ग्रामीण बाजारपेठेवर आणि अर्थचक्रावर होण्याची शक्यता आहे.
रब्बी हंगामावरही अनिश्चिततेचे सावट
सध्या परिसरातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. एखादा जोरदार आणि समाधानकारक पाऊस झाला, तरच उर्वरित पिकांना तात्पुरते जीवदान मिळेल आणि आगामी रब्बी हंगामाची आशा जिवंत राहील, अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करत आहे.





