US Embassy | Australia : ऑस्ट्रेलियात अमेरिकेच्या दूतावासाची तोडफोड

सिडनी, (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियात पॅलेस्टिन समर्थक निदर्शकांकडून अमेरिकेच्या दूतावासाची तोडफोड करण्यात आली आहे. सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास उत्तर सीडनीतील या दूतावासाच्या काचा फोडण्यात आल्या.
या दूतावासातील ९ हॉटेलांत नव्याने बसवण्यात आलेल्या खिडक्यांच्या काचा गडद रंगाचा स्वेटशर्ट घातलेल्या एका व्यक्तीने हातोड्याने फोडत असल्याचे सीसीटिव्हीमध्ये आढळून आले आहे. यावेळी दूतावासाबाहेरच्या प्रवेशद्वारावर पॅलेस्टिनी चिन्ह ग्राफिटीच्या माध्यमातून रंगवण्यात आले.
न्यू साऊथ वेल्समध्ये सार्वजनिक सुटी असल्यामुळे सोमवारी दूतावासाची इमारत बंद होती. मात्र मंगळवारी दूतावास पुन्हा उघडला जाणार आहे, असे वाणिज्य दूतावासाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ऍन्थनी अल्बानीज यांनी इस्रायल आणि पॅलेस्टिनी या दोन्ही बाजूंच्या निदर्शकांना तणाव कमी करण्यासाठी एकमेकांशी संवाद करण्याचे आवाहन केले आहे.
मध्यपूर्वेमद्ये सध्या जे काही घडते आहे, त्यामुळे अनेकांना वेदना होत आहेत. विशेषतः इस्रायल किंवा पॅलेस्टिन व्याप्त भूभागात ज्यांचे नातेवाईक आहेत, त्यांना खूप जास्त दुःख होते आहे. मात्र अमेरिकेच्या दूतावासाला रंगवून काहीही साध्य होणार नाही. मालमत्तेचे नुकसान करणे हा केवळ एक गुन्हा आहे, असे अल्बानीज म्हणाले.
यापूर्वीही रंगवण्यात आली होती ग्राफिटी
ऑस्ट्रेलियातील अमेरिकेच्या दूतावासावर एप्रिल महिन्यात देखील निदर्शकांनी फ्री गाझा अशी अक्षरे ग्राफिटीने रंगवली होती. तर मेलबर्नमधील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासावर पॅलेस्टिन समर्थक निदर्शकांनी ३१ मे रोजी हल्ला करून तोडफोड केली होती.





