राहुरी,(प्रतिनिधी): मोटारसायकल खरेदी- विक्री करणाऱ्या एजंटकडे विक्रीस असलेली मोटारसायकल विकत घ्यायची, असे सांगून चक्कर मारण्यासाठी गेलेला भामटा मोटारसायकल घेऊन पसार झाला. ही घटना राहुरी फॅक्टरी येथे घडली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुनिल डॅनियल शेंडगे (वय ५०) हे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे राहत असून त्यांचे राहुरी फॅक्टरी कारखान्याच्या पंपासमोर साई अँटो नावाने गाड्या खरेदी विक्री व सर्व्हिसिंग गॅरेज आहे. दुपारी १ वाजेदरम्यान सुनील शेंडगे यांच्या साई अँटो गॅरेज तेथे एक अनोळखी भामटा त्याच्या ताब्यातील ॲक्टिव्हा गाडी (एम एच १६- पी- ९१४७) घेऊन आला. शेंडगे यांना म्हणाला की, मोमीन आखाडा येथील असून मला सेकंड हॅन्ड गाडी घ्यावयाची आहे. तुमच्याकडची मोटारसायकल मला आवडली, मी चक्कर मारून पाहतो, असे सांगून तो भामटा सुनिल शेंडगे यांच्याकडे विक्रीस असलेली बजाज कंपनीची प्लॅटिना गाडी (क्र. एम एच १९- सीएन- ८२२१) मोटारसायकल चक्कर मारण्यासाठी घेऊन गेला. तो परत न येता तसाच पसार झाला. शेंडगे यांनी थोडा वेळ वाट पाहिली पण तो परत आला नाही. तेव्हा शेंडगे यांनी त्याचा परिसरात शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. त्या भामट्याने गाडी चोरून नेल्याची खात्री झाल्यानंत शेंडगे यांनी काल राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.