रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरू; शिंदे गटाच्या आमदाराने सुनील तटकरेंची औरंगजेबासोबत केली तुलना

Raigad Guardian minister | रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन राष्ट्रवादी आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे. अजित पवार गटाच्या आदिती तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले या दोघांनीही पालकमंत्रिपदाबाबत आग्रह केला आहे. यावरून शिवसेनेचे कर्जत येथील आमदार महेंद्र थोरवे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. महेंद्र थोरवेंनी खासदार सुनील तटकरे यांची तुलना थेट औरंगजेबाशी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्री पदाला घेऊन पंचाचा निर्णय अंतिम असतो, असा टोला मंत्री भरत गोगावले यांना लगावला होता. त्यावर आमदार महेंद्र थोरवे यांनी ‘पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि या सामन्यात तुम्ही कप्तान होत असताना सर्व मिळायला हवं असं चालणार नाही. क्रिकेट खेळाचे उदाहरणे आम्हाला देऊ नका. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत,’ असे महेंद्र थोरवे यांनी तटकरेंना सुनावले.
“आज पंचांनी निर्णय जरी दिला असला तरी क्रिकेट पुढे गेलेला आहे आणि यामध्ये थर्ड अंपायर आलेला आहे. मात्र थर्ड अंपायरने हा पालकमंत्री पदाचा निर्णय चुकीचा होता म्हणून आपण पालकमंत्री पदाबाबत स्थगिती देऊ शकलो. कर्णधाराने सर्व सहकाऱ्यांना सामावून घेतले पाहिजे. आम्ही तुम्हाला मदत केली म्हणूनच तुम्ही कप्तान होऊन खासदार झालात आणि केंद्रात गेला,” अशी टीकाही थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर केली.
‘आजचा औरंगजेब कुठंय? तर सुतारवाडीमध्ये..’
पुढे आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, ‘छावा चित्रपटामध्ये औरंगजेबाचं स्थान अकलूजमध्ये दाखवलं होतं. महाराष्ट्रातल्या अकलूज येऊन डेरा बांधून त्याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं. आजचं अकलूज कुठंय? सुतारवाडीला, आजचा औरंगजेब कुठंय? तर तो सुतारवाडीमध्ये बसलेला आहे.चुकीच्या पद्धतीने आमच्याशी राजकारण कराल, तर लक्षात ठेवा. कर्जत मतदारसंघ लढतोय. भरत गोगावले यांनी आशीर्वाद दिला तर रायगडमध्ये येऊन लोकसभा लढायची तयारी आम्ही ठेवू.’
दरम्यान, रायगड पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले आणि अदिती तटकरे इच्छुक होते. मात्र या लढाईत अदिती तटकरे यांनी बाजी मारली होती. यावरून भरत गोगावले समर्थक आक्रमक झाले आहेत. भरत गोगावले यांना डावलल्यावरून महाडमधील शिवसैनिक संतापले आहेत. त्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती.
हेही वाचा:





