Pimpri : रविवारी शहरात धडाडणार राज ठाकरेची तोफ

पिंपरी : मनसेच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त अध्यक्ष राज ठाकरे यांची चिंचवडमध्ये रविवारी (दि. ९) तोफ धडाडणार आहे. पहिल्यांदाच शहरात वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडत आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये सकाळी १० ते १२ या कालावधीत होणार्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण राज्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
मनसेची स्थापना होऊन १९ वर्ष उलटले आहेत. या काळात अनेक घडामोडींना पक्ष सामोरा गेला. दरम्यान, दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करत असतात. यावर्षी मनसैनिकांच्या आग्रहास्तव पिंपरी चिंचवड शहरामध्ये कार्यक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यावेळी ते महापालिका निवडणुकांबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. तसेच लोकसभेला घेतलेली भूमिका व विधानसभेत आलेले अपयश याबाबत देखील ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. तसेच आगामी काळात पक्षांची ध्येय धोरणे मांडतानाच काही नवीन घोषणा करण्याची शक्यता आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपाचे दोन आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आहेत. पिंंपरी-चिंचवड उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे पवारांच्या बालेकिल्ल्यात येऊन ठाकरे भाजप आणि अजित पवार यांच्यावर काय बोलणार याबाबत राजकीय वर्तुळात खलबते सुरू झाली आहेत.
शहर मनसेत दोन गट?
पिंपरी चिंचवड शहरामध्ये मनसेची ताकद नाही. महापालिकेमध्ये एकच नगरसेवकावर संपूर्ण पक्षाची धुरा सोपवण्यात आली होती. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये देखील दोन गट पडलेले आहेत. वर्धापन दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेकडे अनेक पदाधिकार्यांनी पाठ फिरवली होती. याबाबत बोलताना शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी काही पदाधिकार्यांना वैद्यकीय कारणे असून मोजक्याच पदाधिकार्यांमध्ये घोषणा करण्याचे ठरले असल्याचे सांगत बाजू सावरून नेण्याचा प्रयत्न केला.
नाटक रद्द केले का?
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये नाटकांचे प्रयोग होत असतात. दरम्यान, या कार्यक्रमासाठी काही प्रयोग रद्द केल्याची बातमी समाज माध्यमात फिरत होती. याबाबत बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, कार्यक्रमाची वेळ सकाळी १० ते १२ आहे. याबाबत माहिती घेतली. या वेळेत कोणाताही प्रयोग नाही. म्हणून याचवेळी कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले आहे. जर नाटकाचे प्रयोग असते तर ते रद्द न करता दुसर्या ठिकाणी कार्यक्रम घेतला असता.





