संडेस्पेशल: ईश्‍वराचे सत्य स्वरूप

अशोक सुतार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, आपणचि मंदिर, मूर्ति, पूजारी । आपणचि पुष्पें होऊनि पूजा करी । आपणचि देवरूपें अंतरी। पावे भक्तां।। परमेश्‍वर सर्वत्र व्यापला आहे. तो चराचरात आहे, गरिबांमध्ये, श्रीमंतांमध्ये आणि अनाथ, वंचितांमध्ये व्यापला आहे. परमेश्‍वर एकच आहे पण तो अनेक रूपांत भासमान होतो. तो अणुरेणूतून व्यापला आहे. मंदिर, मूर्ती, फुले, गुरू, शिष्य, विविध कला ही सारी त्याचीच रूपे आहेत. मी आणि परमेश्‍वर एकच आहोत. ही अद्वैताची भावना ज्याच्यामध्ये निर्माण झाली, त्याने केलेले कोणतेही कार्य ईश्‍वरापर्यंत पोहोचते. म्हणजेच व्यक्‍ती निश्‍चित ध्येयाप्रती पोहोचते.

मनुष्य प्राणी हा सर्व प्राणिमात्रात श्रेष्ठ समजला जातो. तो आपल्या भावना व्यक्‍त करतो, नीतिमत्ता त्याच्या ठायी असते, बऱ्या-वाईट विचारांची जाण असते. या सर्व झाल्या आदर्श गोष्टी! परंतु वास्तव काय आहे?
मानवाने मानवतेचा वसा सोडू नये, प्राणिमात्रांविषयी सहानुभूती बाळगावी, रंजल्या-गांजल्यांना मदत करावी, सृष्टीला प्रमाण मानावे. सृष्टीला डावलून, तिच्यावर अत्याचार करून आज सुख ओरबाडून घेण्याची प्रवृत्ती मानवात निर्माण झाली आहे. चंगळवादासाठी तो सृष्टी, निसर्गाचा नाश करत आहे मात्र, मानवाचे अस्तित्व निसर्गाच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. निसर्गाचा नाश केला तर मानवाचा नाशही अटळ आहे. निसर्ग मानवाचा देव आहे. प्रत्येक माणसात देव आहे, मानवता आहे. असा समाज घडला तर सर्वजण ईश्‍वररूप होतील किंवा आदर्श नीतिमत्तेचे पुजारी होतील.

काहीजण ईश्‍वर म्हणजे पूजापाठ, कर्मकांड, रूढी-परंपरा, कट्टर धार्मिकता असे समजतात. ते योग्य नव्हे. आपण ईश्‍वराकडे ज्या नजरेने, विचाराने पाहत आहोत, ती नजर संकुचित आहे. समाजात अनाथ, गरीब, वंचित माणसे आहेत. रंजल्या, गांजलेल्यांना मदत करा, एखाद्याचे आयुष्य उभारण्यासाठी प्रयत्न करा, देव तेथेची आहे. मानव अज्ञानी आहे म्हणूच अनंत दु:खे भोगत आहे. संत तुकडोजी महाराज म्हणतात, तुझ्या शक्‍तीची ही पूर्णावलि। अजूनि नाही जीवाभावांत शिरली। म्हणोनीच अज्ञानदशा उरली। आम्हांपाशी।। महाराज पुढे म्हणतात, अज्ञानामुळे विकार माजती। अज्ञानेंचि लाभते कुसंगति । अज्ञानानेच दुरावते प्राप्ति । सत्यस्वरूप देवाची।।

मानवतेची, समतेची भावना अजून आमच्यात निर्माण झालेली नाही म्हणून अज्ञान शिल्लक आहे. अद्वैत भावना आमच्यात असती तर हे विश्‍व आमचे झाले असते, इथेच फुलला असता स्वर्ग! आमच्यात हीन भावना असल्यामुळे खरा ईश्‍वर आम्ही शोधू शकलो नाही आणि परमानंदही मिळत नाही. इतरांच्या दु:खाची, कष्टाची आम्हाला पर्वा वाटत नाही, एवढे आम्ही लोभी आहोत आणि यालाच आम्ही प्रतिष्ठा मानतो, हे आमचे अज्ञान होय. यातून बाहेर पडायचे तर संकुचित विचार सोडा, समाजाला प्रेमभावनेने जोडा. ईश्‍वर तिथेच आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.