‘आता ही नासूर झालेली व्याधी मुळापासून उपटण्याची वेळ आलीय’; बलोच नेते मीर यार यांचे एस. जयशंकर यांना जाहीर पत्र

नवी दिल्ली/क्वेटा: चीन आणि पाकिस्तान यांच्यातील वाढती जवळीक ही भारत आणि बलूचिस्तान या दोघांच्याही सुरक्षिततेसाठी मोठा धोका असल्याचे स्पष्ट करत, प्रमुख बलोच नेते आणि मानवाधिकार कार्यकर्ते मीर यार बलोच यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना एक जाहीर पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी बलूचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी भारताकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली असून, “नासूर झालेली ही व्याधी आता मुळापासून संपवण्याची वेळ आली आहे,” अशा शब्दांत पाकिस्तानवर हल्ला चढवला आहे.
चीनकडून बलूचिस्तानमध्ये लष्करी तैनातीची शक्यता
मीर यार बलोच यांनी आपल्या पत्रात एक खळबळजनक दावा केला आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) आता अंतिम टप्प्यात असून, येणाऱ्या काही महिन्यांत चीन बलूचिस्तानमध्ये आपली लष्करी तुकडी तैनात करण्याची शक्यता आहे. ६ कोटी बलोच जनतेच्या संमतीशिवाय होणारी ही लष्करी हालचाल भारत आणि बलूचिस्तान या दोन्ही देशांच्या भविष्यासाठी “अकल्पनीय धोका” असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक
२०२६ च्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना मीर यार यांनी मोदी सरकारचे आभार मानले आहेत. विशेषतः गेल्या वर्षी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख त्यांनी केला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने उचललेली पावले धाडसी आणि अनुकरणीय असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
Open letter to Honorable Foreign Minister of #Bharat Shri @DrSJaishankar ji
From,
Baloch Representative,
Republic of Balochistan
State.
The Honorable Dr. S. Jaishankar,
Minister of External Affairs,
Government of Bharat,
South Block, Raisina Hill,
New Delhi – 110011January… https://t.co/WdjaACsG2V pic.twitter.com/IOEusbUsOB
— Mir Yar Baloch (@miryar_baloch) January 1, 2026
भारत आणि बलूचिस्तानचे आध्यात्मिक नाते
बलूचिस्तान आणि भारताचे संबंध केवळ राजकीय नसून ते ऐतिहासिक आणि आध्यात्मिक आहेत, असे मीर यार यांनी म्हटले आहे. बलूचिस्तानमधील हिंगलाज माता मंदिर (नानी मंदिर) हे दोन्ही देशांमधील सामायिक वारसा आणि अतूट आध्यात्मिक संबंधांचे प्रतीक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
‘२०२६ बलूचिस्तान जागतिक मुत्सद्दी सप्ताह’
मे २०२५ मध्ये बलूच नेत्यांनी पाकिस्तानपासून स्वातंत्र्य घोषित केले होते. आता या संघर्षाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात ‘बलूचिस्तान जागतिक मुत्सद्दी सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. याद्वारे बलूचिस्तानला जगातील इतर देशांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळेल, असा विश्वास मीर यार यांनी व्यक्त केला आहे.
“बलूचिस्तानने गेल्या ६९ वर्षांपासून पाकिस्तानचा छळ आणि मानवाधिकार उल्लंघन सहन केले आहे. आता वेळ आली आहे की, ही समस्या कायमची संपवून शांतता आणि सार्वभौमत्व प्रस्थापित केले जावे.” — मीर यार बलोच (परराष्ट्र मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून)





