आफ्रिकेत इस्लामिक स्टेटचा धोका वाढला..

नवी दिल्ली – आफ्रिकेत इस्लामिक स्टेट या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा धोका वाढू लागला आहे, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. पश्चिम आफ्रिका आणि साहेलमधील राजकीय अस्थिरतेमुळे दहशतवादी कारवाया वाढत आहेत. आप्रिकेतून जगभर दहशतवादी कारवाया करण्याचे नियोजन असल्याचे संयुक्त राष्ट्राचे दहशतवाद विरोधी प्रमुख व्लादिमिर वोरोन्कोव्ह यांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला इस्लामिक स्टेटचा मोठा धोका आहे. संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांनी दहशतवादाचा मुकाबला करण्याचा जोरदार प्रयत्न केला असला तरी हा धोका अजूनही कायम आहे. विशेषतः संघर्ष सुरू असलेल्या क्षेत्रात हा धोका सर्वात जास्त आहे. इराक आणि सीरियामध्ये इसिसचे प्राबल्य होते. तेथे आणि दक्षिण -पूर्व आशियामध्येही आता इसिस सक्षम होऊ लागली आहे, असेही वोरोन्कोव्ह यांनी म्हटले आहे.
पश्चिम आप्रिका आणि साहेलचा उर्वरित जगाशी संपर्क तुटला आहे. तेथील परिस्थिती अतिशय गुंतागुंतीची झाली आहे. प्रादेशिक वादाचा फायदा घेऊन इसिसने तेथे आपले पाय मजबूत केले आहेत, असेही वोरोन्कोव्ह यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत बोलताना सांगितले.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या शासनाच्या प्रयत्नांमुळे देशाच्या आत हल्ले करण्याच्या इसिसच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. परंतु संयुक्त राष्ट्रांच्या तज्ञांनी तालिबान आणि अल-कायदा यांच्यातील संबंध सर्वश्रुत आहेत, असेही वोरोन्कोव्ह म्हणाले.





