Tata Sierraने सर्व रेकाॅर्ड मोडले! पहिल्याच दिवशी बुक झाल्या ‘इतक्या’ गाड्या

Tata Sierra SUV : टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित ‘टाटा सिएरा‘ (Tata Sierra SUV) पुन्हा एकदा भारतीय रस्त्यांवर राज्य करण्यासाठी सज्ज झाली आहे. १६ डिसेंबरपासून या एसयूव्हीची अधिकृत बुकिंग सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी या गाडीने लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. अवघ्या २४ तासांत ७०,००० हून अधिक ग्राहकांनी २१,००० रुपयांचे टोकन रक्कम भरून आपली सिएरा बुक केली आहे.
टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार, बुकिंग सुरू होताच ग्राहकांनी पोर्टलवर तुफान गर्दी केली. ७० हजार बुकिंग्स व्यतिरिक्त, तब्बल १३ लाख ग्राहकांनी टाटाच्या वेबसाइटवर लॉग-इन करून आपल्या आवडीचे व्हेरिएंट कॉन्फिगर केले आहे. यावरून या गाडीबद्दल असलेली उत्सुकता स्पष्ट होते. यापूर्वी जुलै २०२५ मध्ये ‘हॅरियर ईव्ही’ला पहिल्या दिवशी १०,००० बुकिंग्स मिळाल्या होत्या, त्या तुलनेत सिएराचा आकडा सात पटीने मोठा आहे.
किंमत आणि इंजिनचे पर्याय –
मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी टाटाने सिएराची किंमत अत्यंत स्पर्धात्मक ठेवली आहे. सुरुवातीची किंमत ११.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम), टॉप मॉडेलची किंमत: २१.२९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. कंपनीने ही गाडी ७ ट्रिम लेव्हल्स (Smart+, Pure, Pure+, Adventure, Adventure+, Accomplished, आणि Accomplished+), ३ इंजिन पर्याय आणि ३ ट्रान्समिशन पर्यायांसह बाजारात आणली आहे.
खास वैशिष्ट्ये आणि आधुनिक तंत्रज्ञान –
टाटा सिएरा केवळ नावामुळेच नाही, तर तिच्यातील अत्याधुनिक फीचर्समुळेही चर्चेत आहे. बेस व्हेरिएंट (Smart+) मध्येच ५० हून अधिक सेफ्टी आणि कंफर्ट फीचर्स देण्यात आले आहेत. टॉप एंड ‘Accomplished+’ व्हेरिएंटमध्ये ट्रिपल स्क्रीन सेटअप, हेड-अप डिस्प्ले आणि लेव्हल-२ ADAS ही प्रगत सुरक्षा यंत्रणा उपलब्ध आहे. प्रीमियम ग्राहकांसाठी कंपनीने यात नवीन १.५ लीटर हायपेरियन (Hyperion) टर्बो-पेट्रोल इंजिन दिले आहे.
९० च्या दशकातील लोकप्रिय ‘सिएरा’चा वारसा जपताना टाटा मोटर्सने तिच्या आयकॉनिक डिझाइनमध्ये आधुनिक बदल केले आहेत. जुन्या सिएराची आठवण करून देणारी मोठी काच आणि बॉक्सी लूक नव्या अवतारातही कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे जुन्या चाहत्यांसह तरुण पिढीही या गाडीकडे आकर्षित होत आहे. एकूणच, सिएराच्या या जबरदस्त एन्ट्रीमुळे मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटमधील इतर कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.




