Avkarika Movie Trailer : ज्यांच्या श्रमातून देश घडतो, त्यांची कहाणी….अवकारीका चित्रपटाचा विचार करायला लावणारा ट्रेलर रिलीज

Avkarika Movie Trailer : देशात सर्वदूर अनेक ठिकाणी आपल्याला कचऱ्याची मोठी समस्या आढळून येईल. या समस्येपासून मुक्तता करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण खरंच शहरातील कचरा, घाण्याचे साम्राज्य पूर्णपणे दूर झाले आहे का? तर याचे उत्तर नाही असेच मिळेल. याच विषयाला अनुसरून अवकारीका नावाचा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची व्यथा मांडणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. येत्या १ अॅागस्टला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ज्यांच्या श्रमातून देश घडतो, त्यांची कहाणी आता मोठ्या पडद्यावर! अशी टॅगलाइन चित्रपटाच्या ट्रेलरला देण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता पंकज धुमाळ मुख्य भूमिकेत असून या अगोदर तो महेश मांजरेकर यांच्या केसरी या मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांनी केले आहे.
चित्रपटातून स्वच्छेतविषयी संदेश देण्यात आला असून स्वच्छता हे आपली जबाबदारी असल्याची जाणीवही करून दिली आहे. या चित्रपटाची कथा एका सफाईकर्मचाऱ्याची आहे. त्याच्या कामाबाबत लोकांमध्ये असलेली तूच्छतेची भावना, त्याला माणूस म्हणून न पाहिणे, हिन दर्जाचे वागणूक देणे यामुळे त्याच्या आयुष्यात होत जाणारे बदल याविषयी भाष्य करणारा हा चित्रपट आहे.
लोकांच्या अशा वागणुकीमुळे त्याला स्वतः कडे पाहण्याची किळस येते. तो करत असलेले काम त्याला नको वाटतं, यामुळे त्याच्या आयुष्यात अनेक प्रसंग उभे ठाकतात, असे एकूण अवकारिका या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर समजते. चित्रपटाचा ट्रेलर विचार करायला लावणार आहे. चित्रपटाची कथा सामाजिक संदेश देणारी आहे. चित्रपटाचा अनेक पुरस्काराने गौरवही करण्यात आला आहे. आता हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे.





