गणपती दर्शनाने होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याची सुरूवात; दगडूशेठ मंदिरात जय्यत तयारी

पुणे : पुणे तसेच पिंपरी-चिंचवड येथील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करून जनतेला समर्पित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 1 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान आपल्या पुणे दौऱ्याची सुरुवात ही दगडूशेठ गणपती दर्शनाने करणार आहेत. सकाळी 11 वाजता मोदी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. त्यासाठी मंदिरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमिवर सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरक्षेच्या दृष्टीने दगडूशेठ मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद असणार आहे. तसेच लाईव्ह प्रक्षेपण देखील बंद असणार आहे असे सांगण्यात आले आहे. दरम्यान दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून पुणेकरांना सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले.
जय गणेश!
सूचना : १ ऑगस्ट २०२३ रोजी मंदिर स. ६ ते दु. १ पर्यंत भाविकांसाठी दर्शनासाठी बंद राहील, तसेच आपले लाईव्ह प्रक्षेपणही बंद राहील, कृपया सहकार्य करावे.
तसदीबद्दल क्षमस्व !🙏🏻🙏🏻https://t.co/CW7Tnb7MzJ#shrimant #shrimantmoraya#shrimantdagdusheth#dagdusheth pic.twitter.com/a7G42OfUeq— Shrimant Dagdusheth Ganpati (@DagdushethG) July 31, 2023
दगडूशेठ गणपती मंदिरात पंतप्रधान मोदी येत असल्याने त्यांच्या स्वागतासोबतच सुरक्षेसाठी देखील बंदोबस्त ठेवण्यात आलेल्या आहे. तसेच शहरातील अनेक महत्वांच्या रस्त्यांवरील वाहतूकीमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. मोदींचं मंदिरात पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात येईल. तसेच ढोल-ताशाच्या वादनानंतर पंतप्रधानांच्या हस्ते मंदिरात महापूजा आणि महाआरती करण्यात येईल.
पंतप्रधान यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सकाळी 11.45 वाजता प्रदान करण्यात येईल. त्यानंतर दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रोला हिरवा कंदील दाखवून विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प-2ला हिरवा झेंडा दाखवून नरेंद्र मोदी हे पुणे मेट्रो टप्पा-1च्या कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण करणार आहेत. फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत मेट्रो रूट असणार आहे. या प्रकल्पाची पायाभरणी 2016मध्ये पंतप्रधानांच्याच हस्ते झाली होती. मेट्रो रेल्वेचे हे नवीन विभाग पुणे शहरातील शिवाजीनगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांसारखी महत्त्वाची ठिकाणांना जोडणार आहे.





