Stock Market News : शेअर बाजारात खरेदी विक्रीच्या लाटा

मुंबई – महागाई, युद्ध आणि इतर कारणामुळे भारताबरोबरच परदेशातील शेअर बाजारामध्ये खरेदी-विक्रीच्या लाटा येत आहेत. भारतीय शेअर बाजारातही सकाळी शेअर बाजार निर्देशांक कमी झाले होते. मात्र नंतर खरेदी वाढून निर्देशांकात वाढ झाली.
गेल्या तीन दिवसापासून भारतीय शेअर बाजार निर्देशांकात वाढ होण्यास मदत होत आहे. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 246 अंकांनी वाढून 54,767 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 62 अंकांनी म्हणजे 0.38 टक्क्यांनी वाढून 16,340 अंकावर बंद झाला.
ऍक्सिस बॅंक, महिंद्रा, बजाज फिन्सर्व, इंडसइंड बॅंक, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, स्टेट बॅंक ऑफ इंडिया या कंपन्याच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला. मात्र एचसीएल टेक्नॉलॉजी, नेस्ले इंडिया, सन फार्मा, कोटक महिंद्रा बॅंक, इन्फोसिस, डॉक्टर रेड्डीज, एशियन पेंट्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. अमेरिका, युरोप, हॉंगकॉंग, दक्षिण कोरिया येथील शेअर बाजार निर्देशांक कमी झाले. चीनमधील शेअर बाजार निर्देशांकात वाढ झाली होती.
परदेशी गुंतवणूकदाराकडून खरेदी
गेल्या सहा महिन्यांमध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून बरीच गुंतवणूक काढून घेतली आहे. मात्र या महिन्यात हे गुंतवणूकदार काही प्रमाणात खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे. काल या गुंतवणूकदारांनी 156 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केल्याची आकडेवारी शेअर बाजारांनी जाहीर केली. जर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारांमध्ये खरेदी वाढविली तर रुपयाचे मूल्य वाढण्यास मदत होणार आहे.





