निवृत्तीनंतर पुण्यातील एका जोडप्याने देशी गुलाब फुलवून सुरू केला व्यवसाय; वाचा प्रेरणादायी प्रवास

पुणे – भोर तालुक्यातील रावडी या ठिकाणचे वर्षा विश्वास जोशी आणि विश्वास हरी जोशी या जोडप्यानं घरगुती देशी गुलाबापासून जोशी फुड्स या नावाने गुलकंद निर्मिती उद्योग सुरू केला. गेल्या अनेक वर्षापासून हे गुलकंद विक्रीस उपलब्ध करून देण्यात आल आहे.
गेल्या 40 वर्षापासूनचे घराजवळचे दहा गुंठे क्षेत्र पडीक होते. त्यावर देशी गुलाबाची साडेतीनशे झुडपे लावली. पुण्याच्या आयुर्वेद रसशाळेत जाऊन तेथील अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन कोव्हीड काळात हा व्यवसाय त्यांनी सुरु केला. वर्षाकाठी मागणीनुसार 500 किलो गुलकंद तयार करून त्याची विक्री केली जाते. याला साधारण 300 ते 400 रुपये प्रति किलो दर मिळतो, अशी माहिती जोशी दाम्पत्यांनी दिली.
खत व्यवस्थापन कसे केले?
सेंद्रिय खतामध्ये निंबोळी पेंड, करंजी पेंड, कोंबडी खत, बकरी लेंढी खत याचा डोस वर्षातून दोन वेळा प्रती झाड 250 ग्रॅम प्रमाणे दिला जातो. तसेच सुफला, महाधन, मिश्रखत हे 100 ग्रॅम दर सहा महिन्यांनी दिलं जाते.
घरी फुले निवडून, देठे काढून, निरोगी स्वच्छ पाकळ्या निवडायच्या त्यानंतर मिक्सरवर पाकळ्या हाफ क्रश करुन गरजेनुसार साखर, खडीसाखर, खांडसरी साखरेत मिसळून मुरायला झाकून दादरा बांधून उन्हात ठेवून गुलकंद तयार करून पॉलिथीनच्या पिशव्या भरुन सिलींग करून ठेवण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
अनेक वर्षे नोकरी करून गावाकडे राहून उतारवयात स्वकष्टार्जित चार पैसे मिळतात, व्यायाम होतो आणि मन गुंतून राहते, मोकळा वेळ सत्कारणी लागतो, आनंदी जीवन जगता येते, अशी भावना या दांपत्याने व्यक्त केली.





