Stock Market : शेअर बाजार निर्देशांकात माफक वाढ…

मुंबई – देशात आणि परदेशात अनिश्चित वातावरण असताना भारतीय शेअर बाजारात आज बर्यापैकी खरेदी होऊन शेअर बाजार निर्देशांकात मापक वाढ झाली. अदानी समूहातील बहुतांश कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. त्याचबरोबर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात खरेदी चालू केली असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 230 अंकांनी वाढून 80,234 अंकावर बंद झाला. दिवसभरात हा निर्देशांक 407 अंकांनी वाढला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 80 अंकांनी म्हणजे 0.33 टक्क्यांनी वाढून 24,274 अंकावर बंद झाला. सेन्सेक्स संदर्भातील एक कंपनी असलेल्या अदानी पोर्ट कंपनीच्या शेअरचा भाव सहा टक्क्यांनी वाढला.
एनटीपीसी, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, मारुती, अॅक्सिस बँक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. टायटन, स्टेट बँक, एशियन पेंट्स, टीसीएस, एचसीएल टेक, सन फार्मा, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँकेच्या शेअरच्या भावात घट झाली. बहुतांश कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
सागर अदानी आणि अदानी समूहातील इतर अधिकार्यांवर अमेरिकेत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गंभीर आरोप करण्यात आलेले नाहीत. त्यांच्यावरचे आरोप साधे आहेत. त्यांना दंड देऊन हा प्रश्न निकाली निघू शकतो असे स्पष्टीकरण अदानी ग्रीन एनर्जीने शेअर बाजारांच्या व्यवस्थापनाकडे सादर केल्यानंतर आज अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या समूहातील काही कंपन्यांच्या शेअरला अप्पर सर्किट लावावे लागले.
China–US Trade War : चीनमधून अमेरिकेत होणार्या आयातीवर 35 टक्के आयात शुल्क लावणार – डोनाल्ड ट्रम्प
आशियाई शेअर बाजारातील चीन आणि हाँगकाँगमधील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. तर दक्षिण कोरिया आणि जपानमधील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले होते. युरोपातील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले होते. अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक मात्र वाढले होते. दरम्यान खनिज तेलाचे दर 0.63 टक्क्यांनी वाढून 73.23 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात खरेदी चालू ठेवली आहे. काल या गुंतवणूकदारानी 1,157 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. तर सोमवारी जवळजवळ 10 हजार कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली होती.




