Pimpri : जगभरातील प्रेमविरांच्या हाती मावळातील ‘गुलाब’

पवनानगर / पवन मावळ : मावळ हा देशभर भात पिकासाठी प्रसिद्ध असलेला तालुका आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून मावळ हा जगभरात गुलाब उत्पादक तालुका म्हणून प्रसिद्धीस आला आहे.
आज १४ फेब्रुवारी, म्हणजेच व्हॅलेंटाईन डे. जगभरातील प्रेमविरांसाठी प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. आजच्या दिवशी प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या गुलाबाला विशेष मागणी असते.
व्हॅलेंटाईन डे निमित्ताने भारतीय लाल गुलाबाची मावळ तालुक्यातून सुमारे ५५ ते ६० लाख फुले स्थानिक बाजारपेठत, तर परदेशात ४० ते ४५ लाख फुले परदेशात अशी जवळपास १ कोटी फुलांची निर्यात झाल्याची माहिती पवना फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकूंद ठाकर यांनी दिली.
मावळ तालुक्यातील पोषक वातावरण
मावळ तालुक्यातील हवामान हे गुलाब शेतीसाठी पोषक असल्यामुळे येथे चांगल्या प्रतीचा गुलाब येतो. यामुळे येथील अनेक शेतकरी गुलाब शेतीकडे वळू लागले आहे. गेल्या तीन वर्षांत तालुक्यात २०० हेक्टर क्षेत्रावर गुलाब शेती वाढली असून एकूण जवळपास ५०० हेक्टर क्षेत्रावर गुलाबाचे उत्पादन घेतले जाते.
परदेशात पाठवायच्या गुलाबांची विशेष काळजी
परदेशात गुलाब पाठवायचे असल्यास त्याची तयारी १ डिसेंबर पासून होते. झाडांना सेंद्रीय खत देणे, झाडांना रोगराई होऊ नये किंवा रोग असल्यास फवारणी केली जाते. एक फुल तयार होण्यासाठी साधारण ४५ ते ६० दिवसांचा कालावधी लागतो. यावर्षी थंडी कमी असल्याने ४५ ते ५० दिवसात फुले तयार झाली. परदेशात गुलाब पाठविण्यासाठी कुठल्याही प्रकारचे रोग नसणे आवश्यक आहे.
व्हॅलेंटाईन डेसह इतर दिवशी मागणी
व्हॅलेंटाईन डे नंतर १५ एप्रिलपासून जूनपर्यंत लग्न सोहळे, नवरात्र उत्सव काळाच फुलांना चांगली मागणी असते. इतरवेळी होलसेल दराने ७ ते ८ रुपये दराने विकली जाणारी फुले, व्हॅलेंटाईन डे काळात मात्र किमान १२ ते १५ रुपये दराने विकली जातात.
गुलाब शेतीवर ‘महिलाराज’
गुलाब फुलशेती मध्ये मोठ्या प्रमाणावर महिला काम करीत आहेत. फुले काढून आणणे, त्यानंतर त्या फुलांची साईज ठरवणे, फुलांची पॅकिंग करणे आदी कामे जवळपास महिला वर्ग करत असून तालुक्यात गुलाब शेतीत एकूण कामगारपैकी ६५ ते ७० टक्के महिला वर्ग आहेत.
फुलशेतीमुळे रोजगार निर्मिती
फुलशेतीतील बहुतांश कामे मानवीय पातळीवर केली जातात. यामुळे फुल शेती मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राबत असतो. शेतीसाठी लागणारे साहित्य, पॉलीहाऊस उभारणे, औषधे फवारणी, फुलांची वाहतून अशा अनेक कामांसाठी कामगारांची गरज पडते. मावळात गुलाब शेतीतून जवळपास ५००० जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
सर्वाधिक पसंती मिळालेले गुलाब
‘व्हॅलेंटाईन डे’ला ‘डच फ्लॉवर’ प्रजातीतील लाल रंगाच्या टॉपसिक्रेट, बोरडेक्स, फॅशन, सामुराई, कप्परक्लास, ग्रीनगला, फस्टरेड गुलाबांना सर्वाधिक मागणी असते. त्याखालोखाल पिवळ्या रंगाच्या गोल्डस्ट्राईक, गुलाबी रंगाच्या रिव्हायव्हल, पॉईजन, ऑरेंज (नारंगी) रंगाच्या ट्रॉफीकल अमेजॉन, झाकिरा, पांढऱ्या रंगाच्या अविलॉंस या फुलांना अधिक पसंती असते. जपान, हॉलंड, थायलंड, अमेरिका, फ्रांस, जर्मनी, इग्लंड, जपान, दुबई व इथोपिया येथील आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसह पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगळूर, अहमदाबाद, बडोदा, जयपूर, लखनौ, जबलपूर, पाटणा, कोलकता, भोपाळ, इंदोर, सुरत, हैद्राबाद व गोवा अशा स्थानिक बाजारपेठांमध्येही मोठी मागणी आहे.
पवना फुल उत्पादक संघामार्फत परदेशात १३ लाख फुले, तर स्थानिक बाजारपेठत ७ ते ८ लाख फुले निर्यात करण्यात आली आहेत. यंदा तापमानात वाढ झाल्यामुळे फूल उत्पादकांचे उत्पादनाचे वेळापत्रक कोलमडले. निर्यातीसाठी मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. परंतु फुलांना समाधानकारक मागणी होती.
– मुकुंद ठाकर, अध्यक्ष, पवना फुल उत्पादक संघ
फुलांच्या उत्पादनासोबत त्यांची चांगली काळजी घ्यावी लागते. पॉलिहाऊसमध्ये फुले उत्पादन घेणाऱ्या व परदेशात फुले पाठवणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याकडे शीतगृह असणे गरजेचे आहे. फुले निर्यात करण्यासाठी शेतकरी एकत्र आले पाहिजेत.
– ज्ञानेश्वर ठाकर, सचिव, पवना फूल उत्पादक संघ





