नागपूर : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही देशातील सर्वाधिक सक्षम आणि स्थिर असून, सर्व आर्थिक निकषांवर राज्य पात्र ठरत आहे. कर्ज, राजकोषीय तूट, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, सिंचन, वीज, दळणवळण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात राज्याने भरीव काम केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. राज्याची अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना पुढचा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक असल्याचे नमूद केले. विधानसभेत नियम 293 अन्वये मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर आढावा मांडला. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आलेल्या विविध आव्हानांना सामोरे जात निर्णयक्षम आणि समन्वयातून कारभार केल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले, आता या सर्व गोष्टी मागे टाकून महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे. अमृत महोत्सवी महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने वाटचाल करताना सभागृहातील सर्वांनी रचनात्मक कामातून राज्याच्या प्रगतीसाठी एकत्र यावे. अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना सकारात्मकता आणि विकासकेंद्रित दृष्टिकोन आवश्यक असल्याचे नमूद करत “अब आगे बढ़ चुका हूँ मैं… अब पग नहीं रुकने वाले, असे म्हणत विकासाच्या मार्गावर राज्याची वाटचाल थांबणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मुंबई महाराष्ट्राचीच होती, आहे आणि कायम राहील. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्र घडला असून यासंदर्भात कुठलाही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही. सीबीएसईच्या नव्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाला 21 पानांचा सविस्तर समावेश करण्यात आल्याची माहिती देत त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. महाराष्ट्रासाठी तयार करण्यात आलेल्या व्हिजन डॉक्युमेंटचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या विकासासाचा रोडमॅप तयार करताना २०३०, २०३५ आणि २०४७ असे तीन टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडवण्याचे उद्दिष्ट असून २०२९-३० दरम्यान देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्राची असेल, या दिशेने काम सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र खूप पुढे गेला असून, केवळ सामंजस्य करार नाही, तर त्यांची अंमलबजावणी होत आहे. दावोसमध्ये झालेल्या १७ लाख ५७ हजार ८०१ कोटी रुपयांच्या करारांपैकी ७५ टक्के करारांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल असून, २०२४-२५ मध्ये विक्रमी १ लाख ६४ हजार ७७५ कोटी रुपयांची गुंतवणूक आली. देशाच्या एकूण गुंतवणुकीपैकी ३१ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. 2025-26 मध्ये आतापर्यंत 91,337 कोटी रुपये एवढी परकीय थेट गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. विदर्भात इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण, स्टील आणि कोल गॅसिफिकेशनमध्ये मोठी गुंतवणूक येत आहे. मराठवाडा ‘ईव्ही कॅपिटल’ म्हणून विकसित होत आहे. मराठवाड्यात सुमारे 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. त्यातून सुमारे 40 हजार रोजगार निर्मिती झाली आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या पुणे, सातारा, कोल्हापूर या भागातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे.