Pune News | राज्यशासनाला पडला एकतानगरीचा विसर..

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मागील वर्षी खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. त्यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील एकतानगरी, निंबजनगर आणि विठ्ठलवाडीत पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागाला भेट देऊन पूरस्थिती रोखण्यासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले होते. महापालिकेला तातडीने प्रस्ताव पाठवण्याचे आदेशही त्यांनी दिले होते.
महापालिकेने या सूचनेनुसार नदी सुधार योजनेअंतर्गत वडगाव खुर्द ते राजाराम पूल (स्ट्रेच ६) या भागात काम करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन निधीतून ३०० कोटी रुपयांची मागणी करीत शासनाकडे प्रस्ताव पाठवला. मात्र, या प्रस्तावाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. आता नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांनी पुन्हा एकदा पत्र पाठवून हा निधी मंजूर करण्याची विनंती केली आहे.मागील वर्षी २४ व २५ जुलै २०२४ रोजी पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग झाल्यामुळे सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली होती.
विशेषतः मुठा नदीच्या काठावरील एकतानगरी, विठ्ठलनगर आणि निंबजनगर या वसाहतींत पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. या घटनेनंतर मुख्यमंत्री आणि नंतर २२ मे २०२५ रोजी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तथा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनीही पाहणी केली होती.पूरग्रस्त भागातील नागरिक आणि गृहसंस्थांनी मुठा नदीच्या काठावर नदी सुधार प्रकल्प तातडीने राबविण्याची मागणी केली आहे. सध्या अहमदाबादच्या धर्तीवर पुणे शहरात नदीकाठ विकसन प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याचा एकूण अंदाजित खर्च ४,७२७ कोटी रुपये आहे. यामध्ये महापालिकेच्या माध्यमातून ७०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, उर्वरित निधी पीपीपी पद्धतीने आणि क्रेडिट नोट्सद्वारे उभारण्यात येणार आहे. त्याचे काम संगमवाडी ते मुंढवापर्यंत सुरू आहे.
या कामाच्या एका टप्प्यात वडगाव खुर्द ते राजाराम पूल (स्ट्रेच ६) या ४.१० किमी लांबीच्या भागात दोन्ही काठांवर तटबंदी, वृक्षारोपण, सुशोभीकरण, जॉगिंग ट्रॅक आणि नाल्यांचा विकास करण्याचे नियोजन आहे. या कामांसाठी अंदाजे ३०० कोटी रुपये लागणार असून, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या निधीसाठी आपत्ती व्यवस्थापन निधीतून विशेष मंजुरी द्यावी, अशी विनंती नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. हा निधी वेळेवर उपलब्ध झाल्यास नदी सुधार कामांना वेग मिळेल आणि सिंहगड रस्ता परिसरातील पूरग्रस्त भागांना संरक्षण मिळू शकणार असल्याचे आयुक्तांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.





