काश्‍मीरमधील परिस्थिती भयावह आहे -गुलाम नबी आझाद

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी श्रीनगरमध्ये दाखल झालेल्या विरोधकांच्या शिष्टमंडळाला शनिवारी विमानतळावरच रोखण्यात आले. राज्यपालांच्या निमंत्रणाचा धागा पकडून काश्‍मीरमधील परिस्थिती पाहण्यासाठी व स्थानिक लोकांशी संवाद साधण्यासाठी हे नेते निघाले होते. राज्य प्रशासनाने त्यांना विमानतळाबाहेर जाऊ देण्यास निर्बंध घातल्याने जवळपास तीन तासांमध्येच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधी नेत्यांची विमानतळावरूनच दिल्लीला परतपाठवणी करण्यात आली. यानंतर काश्‍मीरच्या परिस्थितीबाबत कॉंग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, काश्‍मीरमधील परिस्थिती भयावह असल्याची माहिती कॉंग्रेसचे ज्येष्ठ गुलाम नबी आझाद यांनी दिली.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी काही विरोधी पक्षातील नेत्यांसह श्रीनगरमध्ये गेले असता त्यांना विमानतळावरूनच माघारी पाठवण्यात आले होते. यावेळी विरोधकांना परिस्थितीची पाहणी करु दिली जात नाही, मोदी सरकार काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे? असा सवाल कॉंग्रेसने विचारला आहे. विरोधकांच्या दौऱ्याचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींसोबतही गैरवर्तणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर, कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काश्‍मीरमधील परिस्थिती भयावह असून तेथील लोकांच्या समस्या ऐकून दगडालाही अश्रू आवरता येणार नाहीत असे म्हटले. आम्हाला विमानतळावरच रोखण्यात आले, शहरात जाण्याची परवानगी नाकारली. पण आमच्या विमानातून प्रवास करणाऱ्या काश्‍मिरी लोकांनी कथन केलेल्या घटना ऐकून दगडालाही अश्रू आवरता येणार नाही. जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थिती भयावह आहे, अशी प्रतिक्रिया आझाद यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×