काबूलमधील स्थिती येतेय पूर्वपदावर; शिक्षणसंस्था मुलींसाठीही राहणार खुल्या

काबुल – नव्याने सत्तेवर आलेल्या तालिबानने अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज कायम ठेवावा या मागणीसाठी अफगाणिस्तानमधील कुनार प्रांतातील युवकांनी एक अभियान सुरू केले आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर एक व्यापक अभियान सुरू करण्यात आले आहे.
अफगाणिस्तान इस्लामिक अमिरातीचा राष्ट्रध्वज कायम ठेवण्यात यावा, असे एका गटाचे म्हणणे आहे. तर देशाला एक संयुक्त ध्वज असावा, असे आणखीन एका गटाचे म्हणणे आहे.
दरम्यान अफगाणिस्तानच्या नव्या सरकारमध्ये महिलांना सहभागी करून घेण्यात यावे या मागणीसाठी महिलांच्या एका गटानेही मागणी केली आहे. या महिलांनी थेट तालिबानशी संपर्क केलेला नाही. मात्र महिलांच्या एखाद्या संघटनेने अफगाणिस्तानमध्ये आपल्या मागण्या मांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
तालिबानी राजववटीत हातात शस्त्र घेउन उघडपणे हिंडणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे आता राजधानी काबुलमधील परिस्थिती सर्वसामान्य व्हायला लागली आहे. काबुलच्या रस्त्यांवर आता नागरिकांची वर्दळ पूर्वीप्रमाणे सुरू झालेली दिसते आहे. मुख्य रस्त्यावरील दुकानेही आता उघडलेली दिसू लागली आहेत. सार्वजनिक वाहतूकही आता सुरळीत हऊ लागली आहे.
देशातील कायदा आणि सुव्यवस्था आटोक्यात राखण्यासाठी तालिबानने चोरांचा बंदोबस्त करायला सुरूवात केली आहे. तालिबानी असल्याचे भासवत लुटालूट करणाऱ्या चोरांना अटक केल्याचे व्हिडीओ तालिबानने पोस्ट करायला सुरूवात केली आहे.
अफगाणिस्तानमधील शिक्षणसंस्था आता मुले आणि मुली दोघांसाठीही उघड्या असतील, असेही जाहीर करण्यात आले आहे. सध्या तरी या शिक्षण संस्था बंदच आहेत. तालिबान्यांच्या एका गटाने काबुलमधील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील डॉक्टर महिलांची भेट घेऊन त्यांना यापुढेही आरोग्यसेवेचे काम सुरू ठेवण्यास सांगितले आहे.





