पुणे जिल्हा | महावितरणचा सावळा गोंधळ

चिंबळी (वार्ताहर) – खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील कुरुळी-चिंबळी-मोई परिसरात महावितरणचा सावळा गोंधळ सुरू आहे. दररोज केव्हाही वीजपुरवठा खंडित होत असल्याने छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने व्यावसायिक संतप्त झाले आहेत. तर नियमित विजबिल भरूनही अखंडित सेवा मिळत नसल्यने ग्राहक हैराण झाले असून महावितरण विरोधात संतापाची सुप्त लाट निर्माण झाली आहे.
परिसरातील विविध छोटेमोठे उद्योग अक्षरश:मेटाकुटीस आले असून याबाबत कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न निर्माण झाला आहे मिळावी, अशी मागणी उद्योगपतींनी केली आहे. वीजबिल भरण्यासाठी चार दिवस विलंब झाला की महावितरणचे कर्मचारी मीटर बंद करण्यासाठी येतात. मग दुरुस्ती का करत नाहीत असा प्रश्न ग्रामस्थ विचारात आहेत. कुरुळी-मोई रस्त्याच्या साइडपट्ट्यावर नवीन खासगी रोहित्र उभारले असून रस्त्यालगत असणार्या रोहित्र व गाडीचा अपघात झाल्यास अधिकारीच जबाबदार असतील.
कुरूळी येथील सोनवणेवस्ती परिसरात विविध कंपन्या असून मु-हे वस्ती, गायकवाड वस्ती, डोंगरे वस्ती, कड वस्ती, बागडे वस्ती परिसरात विविध कंपन्यांची गोदामे व शेतकर्यांच्या शेतीतील विविध माल, कोल्ड स्टोअरेज गोदाम असल्याने अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे, तरी महावितरणने त्वरित अखंडीत वीजपुरवठा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शरद मु-हे यांनी केली आहे.
मागणी करूनही कामे होत नाहीत
नवीन रोहित्र, वाकलेले-जीर्ण झालेले खांब, लोंबकळणा-या तारा बदलण्याची मागणी करून देखील काम होत नाही. या परिसरात निवासी व वाणिज्य ग्राहकांची संख्या असल्याने मिळणार्या तुटपुंज्या सुविधा पुरविण्यात महावितरण कमी पडत असल्याचे चाकण महावितरण कार्यालयात वीज ग्राहक व ग्रामपंचायतीने केलेल्या पत्र व्यवहार नमूद केले आहे.
कुरुळी परिसरात महावितरणचा सावळा गोंधळ सुरू आहे. दररोज वीजपुरवठक खंडित होतो. अभियंता, कर्मचा-यांचा हलगर्जीपणा आहे. वीजपुरवठा सुरळीत सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.
शरद मुर्हे, माजी उपसरपंच




