मनसुख हिरेन यांच्या हत्येमागील गुपित उलगडले; एनआयएच्या तपासातून समोर

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओत स्फोटके आढळून आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. हा मुद्दा गाजत असतानाच स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. या हत्येचा आता उलगडा होत असून एनआयएच्या तपासातून नवीन माहिती समोर आली आहे.
एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर इंग्रजी वृत्तपत्राला तपासाबद्दल माहिती दिली. माहितीनुसार, मनसुख हिरेन यांची स्कॉर्पिओ चोरीला गेल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, हिरेन यांची स्वतः गाडीची चावी सचिन वाझे यांना दिली असल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन कार चोरीला गेल्याची तक्रार हिरेन यांनी केली होती.
यानंतर अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके आढळून आल्याने सचिन वाझेंकडून हिरेन यांच्यावर गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी दबाब आणला जात होता. अंबानी स्फोटके प्रकरणाचा तपास एनआयएकडे जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तर दुसरीकडे हिरेन स्फोटके प्रकरण स्वतःवर घ्यायला तयार नव्हते.
एनआयएकडे तपास जाण्याच्या भीतीने सचिन वाझे घाबरले होते. त्यातून त्यांनी हिरेन यांची हत्या केली. आता आम्ही हिरेन यांची हत्या झाली, त्यावेळी वाझे तिथे होते का? याचा तपास केला जात आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, हिरेन यांच्या हत्येत सहभाग नसल्याचा दावा सचिन वाझेंकडून केला जात असला तरीही त्यांच्याविरुद्ध पुरावे आहेत.




