IND vs AUS 3rd Test | हेड-स्मिथची दमदार शतके, गाबा कसोटीचा दुसरा दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावे…

IND vs AUS 3rd Test Day 2 Stumps : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेतील तिसरा सामना गाबाच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी, पावसामुळे खेळात व्यत्यय आला आणि केवळ 13.2 षटकांचा खेळ होऊ शकला. त्यानंतर सामन्याचा दुसरा दिवस रविवारी पार पडला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गाबा येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या सात बाद 405 धावा इतकी झाली असून खेळ थांबला तेव्हा ॲलेक्स कॅरी 45 आणि मिचेल स्टार्क सात धावांवर नाबाद परतले. याआधी ट्रॅव्हिस हेडने 152 धावांची तर स्टीव्ह स्मिथने 101 धावांची खेळी खेळली. स्मिथने भारताविरुद्धच्या कसोटीतील 10वे आणि कारकिर्दीतील 33वे शतक झळकावले. जसप्रीत बुमराह भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 72 धावांत पाच बळी घेतले.
Stumps on Day 2 in Brisbane!
Australia reach 405/7 in the 1st innings.
Jasprit Bumrah the pick of the bowlers for #TeamIndia so far with bowling figures of 5/72 👏👏
Scorecard – https://t.co/dcdiT9NAoa#AUSvIND pic.twitter.com/500JiP8nsQ
— BCCI (@BCCI) December 15, 2024
रविवारी ऑस्ट्रेलियाने बिनबाद 28 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी 377 धावा जोडताना एकूण सात विकेट गमावल्या. बुमराहने पहिल्या सत्रात उस्मान ख्वाजा (21) आणि नॅथन मॅकस्विनी (9) यांना बाद करून दोन धक्के दिले. यानंतर पहिल्या सत्रातच नितीश रेड्डीने मार्नस लॅबुशेनला (12) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र, यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडने दुसऱ्या सत्रात एकही विकेट पडू दिली नाही. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 242 धावांची भागीदारी केली.
हेडने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 9वे शतक तर स्मिथने 33वे शतक झळकावले. स्मिथ 190 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 101 धावा करून बाद झाला तर हेड 160 चेंडूत 18 चौकारांच्या मदतीने 152 धावा करून बाद झाला. त्यानंतर मिचेल मार्श पाच धावा करून तर कर्णधार पॅट कमिन्स 20 धावा करून बाद झाला. कमिन्सने कॅरीसोबत सातव्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. बुमराहशिवाय सिराज आणि नितीशला प्रत्येकी एक विकेट मिळाली.





