खंभात येथे झालेली दंगल हे गुजरात सरकारचे अपयश – ओवेसी

अहमदाबाद – गुजरात सरकार खंभात परिसरात निघालेल्या धार्मिक मिरवणुकीवेळी तेथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे. तेथे झालेला हिंसाचार हे गुजरात सरकारचे अपयश असून गुप्तचर सूत्रांनी या भागात हिंसक घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली असतानाही राज्य सरकारला हा हिंसाचार का रोखता आला नाही असा सवाल ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.
खासदार ओवेसी म्हणाले की या त्यांनी आपले अपयश स्वीकारले पाहिजे. तुम्ही किती दिवस जुन्या कहाण्या बाहेर काढत राहणार? तुमचे अपयश मान्य करा. तुम्ही स्वतःच यात सहभागी आहात. भजन करायला हरकत नाही पण तेथे कसल्या घोषणा दिल्या? 50-100 तलवारी मिरवल्या गेल्या पोलिसांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला. सरकारला हिंसाचार हवा होता. आणि ते त्यात सहभागी आहेत असा आरोप त्यांनी केला.
10 एप्रिल रोजी रामनवमीच्या मिरवणुकीत खंभातमध्ये उसळलेला जातीय हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता, असे गुजरात पोलिसांनी बुधवारी म्हटले होते.सरकारने या कारस्थानाचा पर्दाफाश करायला हवा होता, असे ओवेसी म्हणाले. तुमच्याकडे आयबी रिपोर्ट असेल तर तुम्ही का झोपला होता? असा सवाल ओवेसी यांनी केला.





