Kolhapur News : कोल्हापूरमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक; परिसरात तणाव

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये सिद्धार्थनगरमध्ये दोन समाजात तेढ निर्माण झाली असून शुक्रवारी रात्री त्याचे दंगलीत रूपांतर झाले. दोन गटांत तुफान दगडफेक, जाळपोळ अन् गाड्यांची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातल्या सिद्धार्थनगर कमानीजवळ दोन गटांत तुफान दगडफेक झाली. चार चाकी आणि दुचाकी वाहनांचे नुकसान करण्यात आले. काही वाहने पेटवून देण्यात आली. सिद्धार्थनगर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकमेकांवर दगडफेक करणा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दगडफेकीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
कोल्हापुरातील सिद्धार्थनगर कमानीजवळ असणा-या चौकात सिद्धार्थनगर आणि राजेबागस्वार येथील दोन गटांमध्ये अनेक दिवस वाद आहे. राजेबागस्वार फुटबॉल क्लबच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त फलक आणि साऊंड सिस्टिम लावण्यात आले होते. यावरून दुपारपासूनच तणाव निर्माण झाला होता. तसेच या चौकात वर्चस्व कुणाचे यावर देखील अनेक वर्षे येथील तरुणांमध्ये वाद आहे. हा वाद शुक्रवारी रात्री उफाळून आला. दोन्ही गटांतील नागरिकांनी एकमेकांवर तुंबळ दगडफेक करण्यास सुरुवात केली.
यावेळी संतापलेल्या काही तरुणांनी या परिसरातल्या चार चाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड केली. तर काहींनी वाहने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात दगडफेक होत असल्याने कोल्हापूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कुमक मागवून जमावावर नियंत्रण आणले. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी होत असल्याने हा वाद अधिक तीव्र होऊ नये यासाठी पोलिसांनी दोन्ही जमावाला पांगवले. तर काहींना ताब्यातही घेतले आहे. हा नेमका वाद कशावरून झाला याबद्दल पोलिसांनी अधिकृतरीत्या माहिती दिली नाही. ज्या बॅनरवरून हा वाद उफाळून आला ते बॅनर पोलिसांनी उतरवले आहेत. सध्या सिद्धार्थनगर परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे.





