बिल्किस बानोप्रकरणी गुजरात सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली

नवी दिल्ली – बिल्किस बानो अत्याचार आणि कुटुंबातील सात सदस्यांच्या हत्या प्रकरणातील दोषी असलेल्या ११ जणांना देण्यात आलेली माफी रद्द करताना गुजरात राज्याविरोधात काही निरीक्षणे सर्वोच्च न्यायालयाने नोंदवली. न्यायालयाच्या या निकालाचे पुनरावलोकन करण्याची मागणी करणारी गुजरात सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने खुल्या न्यायालयात पुनर्विचार याचिका सूचिबद्ध करण्याचा अर्जही फेटाळला. ‘‘पुनरावलोकन याचिका, आव्हानाधीन आदेश आणि त्याबरोबर जोडलेली कागदपत्रे काळजीपूर्वक पाहिल्यानंतर आम्ही समाधानी आहोत. त्यामुळे पुनरावलोकन याचिका फेटाळण्यात आली आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या ८ जानेवारीच्या निकालात गुजरात सरकारविरोधात काही निरीक्षणे केली. गुजरात राज्याला ‘सत्ता हडप करणे’ आणि ‘विवेकाचा गैरवापर’ या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. मात्र ही निरीक्षणे चुकीची असल्याचे गुजरात सरकारने याचिकेत म्हटले आहे.





