पिंपरी | पालिकेतील लिपिकांचे राजीनामा सत्र सुरुच

पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिका आस्थापनेवरील लिपिक पदावर केलेल्या नोकर भरतीला लागलेली गळती थांबत नसल्याचे चित्र आहे. आणखी नवनियुक्त सात लिपिकांनी सेवेचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या सामान्य प्रशासनापुढे पात्र ठरलेल्या अन्य उमेदवारांचा शोध घेण्याची वेळ आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागातील ब आणि क गटातील 386 जागांसाठी ऑनलाइन प्राप्त झाले होते. या नोकर भरतीमध्ये लिपिकाच्या 213 जागांसाठी सर्वाधिक म्हणजेच 33 हजार 897 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते.
या भरतीमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येमुळे राज्यभरातील प्रमुख शहरांमधील परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती.
दरम्यान या नोकरभरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी युवासेनेचे पदाधिकारी विश्वजीत बारणे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती.
मात्र, ही बाब शक्य नसल्याने ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या राज्यभरातील उमेदवारांना लिपिक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
राज्यभरातील उमेदवारांकडून आता आपल्या स्थानिक जिल्ह्यातील नियुक्तीला प्राधान्य दिले जात असल्याने महापालिकेच्या लिपिक पदाचा राजीनामा देत, हे उमेदवार निवड झालेल्या ठिकाणी रुजू होत आहेत. त्यामुळे ही गळती थांबत नसल्याचे चित्र आहे. तर तलाठी पदाचे आकर्षणही या गळतीचे आणखी एक कारण आहे.
एका लिपिकाची केवळ 14 दिवसांची सेवा
आतापर्यंत लिपिक पदाचा राजीनामा देणार्या कर्मचार्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत किमान महिनाभर तर जास्तीतजास्त आठ महिने सेवा बजावली आहे.
मात्र नव्याने राजीनामा दिलेल्या 7 कर्मचार्यांपैकी एका लिपिक कर्मचार्याची केवळ 14 दिवस सेवा बजावल्याची बाब निदर्शनास आली आहे.
आतापर्यंत 36 कर्मचार्यांचा महापालिकेला रामराम
शासकीय व निमशासकीय कार्यालयातील नोकरी सुखाची मानली जाते. सातवा वेतन आयोग, वेळेवर वेतनवाढ, बढती या कारणांमुळे या सेवेला सर्वच जण प्राधान्य देतात.
मात्र स्थानिक जिल्ह्याची व तलाठी भाऊसाहेबाची ओढ स्वस्थ बसू देत नसल्याने आतापर्यंत 36 लिपिकांनी महापालिका सेवेला रामराम ठोकला आहे.





