पुणे | ११ गावांमध्ये “एसटीपी’ प्रकल्प

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे व पिंपरी -चिंचवड महापालिका हद्दीलगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत आहे. या गावांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यास पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुढाकार घेतला आहे.
त्यानुसार 11 गावांमध्ये मलनि:सारण प्रकल्प (एसटीपी ) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 300 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
पुणे तसेच पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या हद्दीलगतच्या गावांचा मोठा वेगाने विकास झाला आहे. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकण होत आहे. मोठ – मोठे रहिवासी प्रकल्पही गावांमध्ये उभे राहिले आहेत. मात्र, नियोजनाचा अभाव असल्यामुळे या सांडपाणी व्यवस्था, एसटीपी प्रकल्प यांची या गावांमध्ये उणीव भासते.
काही ठिकाणी सांडपाणी हे थेट नदी, नाल्यांमध्ये सोडले जाते. परिणामी, नदी प्रदूषण होते. त्यामुळे तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी पीएमआरडीने हद्दीलगच्या 11 गावांमध्ये मलनि:सारण प्रकल्प राबिवण्याचा निर्णय घेतला आहे.
भूगाव, भूकुम, पिरंगुट, लवळे, हिंजवडी, माण, घोटावडे, चाकण – मेदणकरवाडी, शिक्रापूर – सणसवाडी, मारुंजी, केसनंद, चाकण या गावांमध्ये मलनि:सारण प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
केसनंद व चाकण परिसरातील गावांसाठीही मलनि:सारण केंद्र उभारण्यात येणार आहे. पीएमआरडीए प्रशासनाकडून हा प्रकल्प केंद्र शासनाच्या “अमृत’ योजनेअंतर्गत समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.




