पिंपरी | पालिकेच्या १९ शिक्षकांची पदोन्नती स्थगित

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागातील प्रशासनाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. महापालिका शाळेतील १९ उपशिक्षकांना पदोन्नती देऊन विज्ञान समुहातील पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याचा आदेश काढण्यात आला.
त्याच्या दुसऱ्या दिवशीच शिक्षण प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी यू-टर्न घेत हा आदेश मागे घेतला. सर्व शिक्षकांना त्वरीत पूर्वीच्या शाळेतील पदावर रुजू होण्याचे फेर आदेश देण्यात आले. त्यामुळे शिक्षण विभागात नेमके चाललेय तरी काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महापालिकेच्या प्राथमिक विभागात कार्यरत शंभरहून अधिक शिक्षक सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून पदोन्नतीस पात्र असून सुध्दा प्रशासनाकडून त्यांच्या पदोन्नतीचा आदेश काढण्यात येत नव्हता.
परंतु, शिक्षण प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी १७ ऑक्टोबर २०२४ रोजी स्वतंत्र आदेश काढून त्यातील १९ उपशिक्षकांना विज्ञान समुहातील पदवीधर वेतनश्रेणीत एस १४ पदस्थापना व वेतनश्रेणी लागू केली. पदोन्नती झाल्याने वाढीव वेतनश्रेणीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शिक्षकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.
त्याच्या एकच दिवसानंतर म्हणजे १८ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रशासन अधिकारी बांगर यांनी यु-टर्न घेत उपरोक्त शिक्षकांचा पदोन्नती आदेश त्वरीत मागे घेतला.
काही तांत्रिक बाबींची फेर पडताळणी करणे आवश्यक आहे. तरी, सर्व शिक्षकांनी तातडीने त्यांच्या पूर्वीच्या पदावर व शाळेवर रुजु व्हावे. रुजु झाल्याचा अहवाल मुख्याध्यापकांमार्फत शिक्षण विभागास सादर करावा, असे फेर आदेश संगीता बांगर यांनी दिले आहेत.
पदोन्नती दिलेले शिक्षक
अश्विनी घुगे, नम्रता यादव, धनंजय मुंडे, सुनिता धिंडे, किरण चौधरी, आप्पासाहेब पुजारी, दिपाली पवार, सुरेंद्र सरकाळे, विनोद साळुंके, सायली शिंदे, सिध्दार्त पराड, अमोल बालेकर, भाग्यश्री चेचे, प्रज्ञा सोरदे, संतोष घनवट, नरायण मोरे, गीता भुरे, गणेश लिंगडे, विनोद पाटील यांना पदोन्नती देऊन ती मागे घेण्यात आली.
सर्व शिक्षक वैद्यकीय रजेवर
सर्व शिक्षक महापालिका प्राथमिक विभागाच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पदोन्नतीचा आदेश काढल्यानंतर त्यांना नवीन पदस्थापना देण्यात येणार होती.
परंतु, पदोन्नतीचा आदेश संगीता बांगर यांनी मागे घेतल्याने सर्व शिक्षक वैद्यकीय रजेवर गेले आहेत. बांगर यांनी फेर आदेश दिल्यानंतर सुध्दा त्यातील एकही शिक्षक पूर्वीच्या शाळेत पूर्वीच्या पदावर रुजू झालेला नाही.





