पुणे,- जिल्ह्यात विधानसभेच्या 21 जागा असून या सर्वच मतदारसंघात चुरशीची लढत झाली आहे. यंदा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का सुध्दा वाढला आहे. त्यामुळे या वाढलेल्या मतदानाचा फायदा महायुतीला होणार की महाविकास आघाडीला याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील बारामती,, आंबेगाव, खेड-आळंदी, इंदापूर, दौंड, शिरुर, चिंचवड, भोसरी तसेच शहरातील कसबा पेठ, वडगावशेरी, पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट या मतदार संघातील लढतींकडे विशेष लक्ष लागले आहे. बारामतीमध्ये अजित पवार की युगेंद्र पवार बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील 10 मतदारसंघाचा समावेश होतो. जिल्ह्यातील बहुतांश मतदार संघात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र, काही मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीतील बंडखोर देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने त्याचा नक्की कोणाला फायदा होणार किंवा फटका बसणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. बारामती मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आंबेगाव-शिरुर मतदार संघात महायुतीकडून मंत्री दिलीप वळसे-पाटील तर महाविकास आघाडीकडून देवदत्त निकम या दोघांमध्ये मुख्य लढत होत आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विशेष लक्ष घातल्याने येथील निकालाकडेसुध्दा लक्ष लागले आहे. इंदापूर मतदार संघात महाविकास आघाडीकडून हर्षवर्धन पाटील तर महायुतीकडून दत्तात्रय भरणे या दोघांमध्येच लढत होत आहे. मात्र, येथे प्रवीण माने यांनी बंडखोरी केल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे इंदापुरकरांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दौंड मतदार संघात महायुतीचे राहुल कुल आणि महाविकास आघाडीच्या रमेश थोरात या दोघांमध्ये थेट लढत आहे.. त्यामुळे राहुल कुल आणि रमेश थोरात यांच्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर पुरंदार-हवेली मतदार संघात विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या विरोधात पुन्हा एकदा विजय शिवतारे यांच्यात सामना होत आहे. मात्र, येथे महायुतीतील बंडखोर संभाजी झेंडे रिगंणात असल्याने प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील तिरंगी लढतीत कोण मैदान मारणार याच चर्चा रंगत आहे. शिरुर-हवेली मतदार संघात महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार अशोर पवार तर महायुतीकडून अजित पवार यांनी ऐनवेळी ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांना पक्षात घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. अशोक पवार यांच्याप्रमाणे गावांगावात माउली कटके यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यामुळे या मतदार संघात देखील प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे.तर खेड-आळंदी मतदार संघात महायुतीकडून दिलीप मोहिते-पाटील आणि महाविकास आघाडीकडून बाबाजी काळे यांच्यातच मुख्य लढत होत आहे. दोन्ही बाजूने जोरदार तयारी करण्यात आल्याने कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे. तसेच भोर-वेल्हा-मुळशी मतदार संघात महाविकास आघाडीकडून संग्राम थोपटे तर महायुतीकडून शंकर मांडेकर यांच्याबरोबर अपक्ष कुलदीप कोंडे आणि अपक्ष किरण दगडे हे देखील रिगंणात असल्याने रंगत वाढली आहे. तर मावळ मतदार संघात महायुतीकडून सुनील शेळके तर अपक्ष बापूसाहेब भेगडे यांच्यात मुख्य लढत होत आहे. दोघेही उमेदवार तुल्यबळ असल्याने या मतदार संघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर जुन्नर मतदार संघात महायुतीचे उमेदवार अतुल बेनके आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर यांच्यातच मुख्य लढत होत आहे. मात्र, या मतदार संघात महायुतीतील बंडखोर शरद सोनवणे आणि आशा बुचके हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथील चौरंगी लढतीकडे देखील सर्वांचेच लक्ष लागले आहे.