“ठाकरे गटाचे उरलेले आमदार आणि खासदार…”; गिरीश महाजन यांचा दावा

Girish Mahajan | मराठी भाषेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 20 वर्षांनंतर वरळी डोममध्ये विजय मेळाव्यात एकत्र पाहायला मिळाले. यावेळी दोघींनीही सरकारवर टीका केली. त्यानंतर आता भाजपकडूनही पलटवार सुरू झाला आहे.
भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे. ठाकरे गटाचे उरलेले आमदार आणि खासदार माझ्या संपर्कात आहेत, असे गिरीश महाजन यांनी म्हंटले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाला गळती सुरु असल्याची पाहायला मिळत आहे. यातचा आता गिरीश महाजन यांनी हा दावा केला आहे.
नेमकं काय म्हणाले गिरिश महाजन ?
“उद्धव ठाकरे यांच्यावर आता कोणाचाही विश्वास उरलेला नाही. त्यामुळेच आजही उबाठाचे उरलेले आमदार आणि खासदार माझ्या संपर्कात आहेत. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्हाला हे थोड्याच कालावधीत दिसून येईल. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व बाजूला सारून शरद पवार आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केली. केवळ मुख्यमंत्रीपदाच्या मोहापोटी त्यांनी स्वतःचं राजकीय भविष्य खराब केलं,” अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.
पुढे महाजन म्हणाले की, “राज्यात हिंदी विषय लागू करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतला होता. हा निर्णय मंत्रिमंडळात मान्य करण्यात आला होता आणि त्यावर त्यांच्या सह्या आहेत. मात्र आता, हिंदी विषय सक्तीच्या मुद्द्यावर ते याच निर्णयाला विरोध करत असून, या बाबतीत त्यांनी यू-टर्न घेतला. त्यामुळे उद्धव ठाकरे हे पलटीबहाद्दर आहेत, त्यांचे वर्तन बालिश आहे.” Girish Mahajan |
“ठाकरे बंधू एकत्र आल्याचा भाजपला फरक पडणार नाही. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर जनतेचा विश्वास आणि कोणाचा किती प्रभाव आहे, हे स्पष्ट होईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, यावर आता ठाकरे गट काय प्रत्युत्तर देणार? हे पहावे लागणार आहे. Girish Mahajan |
हेही वाचा:





