विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलैपासून

मुंबई : करोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दि. 5 व 6 जुलै रोजी होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनाच्या प्रांगणात झाली. बैठकीत पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजासंदर्भातील तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.
करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून विधानभवनात अधिवेशन कालावधीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांना, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्याकरिता लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी अधिवेशन कालावधीत विधानभवन परिसर प्रवेशाकरिता सर्वांना आरटी-पीसीआर करोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.
यासाठी विधानभवन, मुंबई येथे शनिवार व रविवारी दि. 3 व 4 जुलै रोजी आरटी-पीसीआर करोना चाचणीसंदर्भात व्यवस्था करण्यात येणार आहे.
तसेच गर्दी होऊ नये यासाठी विधान मंडळाच्या सदस्यांचे स्वीय सहायक, वाहनचालक व सुरक्षारक्षक यांची बसण्याची व्यवस्था बाहेरील तंबूमध्ये करण्यात येणार आहे. मंत्री व राज्यमंत्री यांच्यासोबत एकाच अधिकाऱ्याला प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच अधिवेशन कालावधीत खासगी व्यक्तींना विधानभवनात प्रवेश देण्यात येणार नाही. याचबरोबर मंत्रालय अधिकारी व कर्मचारी यांनादेखील मर्यादित स्वरूपात प्रवेश देण्यात येणार आहे.
एका आसनावर एकच सदस्य…
सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने सभागृहामध्ये सदस्यांकरिता एका आसनावर एक सदस्य अशा प्रकारे व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रेक्षक गॅलरी, विद्यार्थी गॅलरीमध्येदेखील सदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. सदस्यांना एक किट देण्यात येणार असून, त्यामध्ये एक फेस शिल्ड, मास्क, हॅंडग्लोव्हज, सॅनिटायझेशनची बॉटल देण्यात येणार आहे.





