सातारा-जावळी मतदारसंघातील प्रकल्प लवकरच मार्गी लागणार

आ. शिवेंद्रराजेंचा पाठपुरावा; हद्दवाढ, कास, बोंडारवाडी, मेडिकल कॉलेजसाठी मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील
सातारा – सातारकरांसाठी महत्त्वाच्या कास धरणाची उंची वाढवण्याच्या कामासाठी बजेटमध्ये जादा निधीची तरतूद करावी. तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करावी. या कॉलेजच्या जागेचा प्रश्न निकाली काढून इमारत बांधकाम सुरू करावे.
उरमोडी प्रकल्पाच्या कालव्याची कामे मार्गी लावावीत. महू-हातगेघर प्रकल्पासाठी निधी, बोंडारवाडी धरणाचे काम सुरू करावे. सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करावा, नवीन एमआयडीसी, सातारा शहर सातारा व जावळी तालुक्यातील रस्त्यांसाठी भरीव निधी मिळावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतीच केली. त्यावर, सातारा-जावळी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा. कास धरण प्रकल्पासाठी बजेमध्ये जादा निधीची तरतूद करावी. उरमोडी प्रकल्पाच्या कालव्यांसाठी निधी देऊन सातारा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न निकाली काढावा. जावळी तालुक्यातील 54 गावांसाठी बोंडारवाडी धरण प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करून त्यासाठी निधी कमी पडू देऊ नये. सातारा शहरालगत नवीन एमआयडीसीसाठी भूसंपादन करताना पिकाऊ शेतजमिनी वगळाव्यात, पडीक, पाणी नसलेल्या जमिनी संपादित करून त्याचा शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरू करावी. जागेचा प्रश्न निकाली काढून इमारतीच्या बांधकामास प्रारंभ करावा. सातारा शहर आणि मतदारसंघातील रस्त्यांसाठी भरीव निधी द्यावा. महू हातगेघर धरणासाठी निधी देऊन हा प्रलंबित प्रकल्प मार्गी लावावा. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालावे, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. ना. ठाकरे यांनी या कामांची सद्य स्थिती जाणून उपाययोजना करण्याचा आदेश ठाकरे यांनी दिला.
मतदारसंघाच्या विकासासाठी आजारपणाला दुय्यम स्थान
दरम्यान, आ. शिवेंद्रराजे यांच्यावर मुंबईत काही दिवसांपूर्वी उपचार करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांना महिनाभर सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. मात्र, आ. शिवेंद्रराजे यांनी आजारपणाला फारसे महत्त्व न देता मतदारसंघातील प्रश्नांसाठी पाठपुरावा सुरू ठेवला. ते दोनच दिवसांत विधिमंडळ अधिवेशनाला उपस्थित राहिले. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व आमदारांची काल (दि. 3) बैठक घेतली. त्या बैठकीस उपस्थित राहून आ. शिवेंद्रराजे यांनी मतदारसंघात व जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांकडून शब्द घेतला.





