पुणे जिल्हा | जागा खरेदीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक

जुन्नर, (वार्ताहर) – जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा नारायणगाव येथील जागा खरेदीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे आता जे संचालक जागा खरेदी करण्यासाठी विरोध करीत आहेत ते देखील या प्रक्रियेत सहभागी होते; परंतु ऐनवेळी त्यांनी केलेला विरोध हा अनाकलनीय आहे.
त्यांचा विरोध ते संचालक मंडळाच्या बैठकीत मांडू शकले असते ते जाहीर करायची आवश्यकता नाही यामुळे समितीची नाहक बदनामी होत आहे, असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. संजय काळे यांनी केले.
जागा खरेदी संदर्भात काही संचालकांनी घेतलेल्या अशा भूमिकेविरुद्ध खुलासा करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर येथील सभागृहात मंगळवारी (दि. 1) झालेल्या पत्रकार परिषदेत सभापती संजय काळे बोलत होते.
या पत्रकार परिषदेत धनेश संचेती, निवृत्ती काळे, पांडुरंग गडगे, सारंग घोलप, नाना घोडे, नबाजी घाडगे, आरती वारुळे, विमल तळपे, जनार्दन मरभळ, जितेंद्र कासार, सचिव रुपेश कवडे उपस्थित होते.
अॅड. काळे म्हणाले की, ठराव झाल्यानंतर जागा मालकांकडून 5 ते 15 एकर जागेसाठी खरेदीचे प्रस्ताव देखील मागविण्यात आले होते. यासाठी पूर्णपणे पारदर्शक प्रक्रिया राबविण्यात आली होती.
मात्र, संचालक माऊली खंडागळे, संतोष चव्हाण, भास्कर गडगे या संचालकांनी जागा खरेदीला विरोध केला तसेच प्रसार माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली होती.
परंतु यापूर्वी या तीन संचालकांसह इतर संचालकांनी प्रस्ताव आलेल्या जागेवर प्रत्यक्ष जाऊन स्थळ पाहणी देखील केली होती नंतर अचानकपणे या तीन संचालकांनी जागा खरेदीची आवश्यकता नाही, अशी भूमिका घेतली गेल्याने ही बाब दुःखाची असल्याची भावना सभापती अॅॅड. संजय काळे यांनी व्यक्त केली.
म्हणून जमीन खरेदीचा केला ठराव
जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा, टोमॅटो, फळे, फुले, भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शेतकर्यांसाठी कोल्ड स्टोरेज सारख्या सुविधा नसल्याने पर्यायाने शेतमाल कमी भावात विकावा लागत आहे
मात्र कोल्ड स्टोरेज सारख्या सुविधा निर्माण झाल्या तर शेतमालाला योग्य भाव मिळून शेतकर्याला आर्थिक पाठबळ मिळेल तसेच भविष्यात टोमॅटो, कांदा, बटाटा यासाठी प्रोसेसिंग युनिट तयार करणे, महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, टोमॅटो केच-अप,
वेफर्स यासारखे कांदा पावडर यासारखे प्रक्रिया उद्योग निर्माण करायचे आहेत यासाठी जागेची आवश्यकता असल्याने जुन्नर, आळेफाटा,ओतूर, बेल्हे, नारायणगाव या परिसरात बाजार समितीला सोयीचे असलेली व जागा खरेदी करण्याचा ठराव बाजार समितीने केला होता.





