औषधांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता
औषधांचे निर्मिती केंद्र बड्डीमध्ये अनेक कंपन्यांचे लॉकडाऊन

बड्डी (हिमाचल प्रदेश) : आशियातील औषध निर्मितीचे मुख्य केंद्र असणाऱ्या बड्डी या हिमाचल प्रदेशातील भागात असणाऱ्या 55 औषध कंपन्यांमध्ये करोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे तेथील उत्पादन नऊ दिवसांसाठी थांबवण्यात आले आहे.
यापूर्वी या कंपन्यात कंपनीच्या आवारात वास्तव्यास असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने 25 ते 30 टक्के उत्पादन सुरू होते. हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यानंतर झारमाज्री आणि नलगढ भागातील फर्मास्युटिकल कंपन्यांसह सर्व औद्योगिक उत्पादने थांबवण्यात आली. या भागात सुरू असणारी दारोदार तपासणी अद्याप संपलेली नाही.
सन फर्मास्युटिकल इंडस्ट्रीजसारख्या मोठ्या कंपन्या या भागात आहेत. मात्र या भागात सहा करोनाबाधित आढळले आहेत. “”सध्या तरी आम्ही आमचे उत्पादन नऊ दिवसांसाठी थांबवले आहे. मोठी मागणी आहे. ऑर्डर पडून आहेत. त्यामुळे आम्ही पूर्ववत परिस्थितीत कधी येतो, हाच आम्हा सर्व जणांपुढे प्रश्न आहे, असे टॉर्क फर्मास्युटिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक पी. एस. चटवाल यांनी सांगितले. ते म्हणाले, 24 मार्चच्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे कच्च्या मालाचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
कच्च्या मालासाठी आम्ही मुख्यत: मुंबईवर अवलंबून आहोत. सध्या सरकारने मालवाहतुकीस परवानगी दिली आहे. तरी कच्चा मालाचा पुरवठा सुरळीत होण्यास 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागेल. या क्षेत्राला आणखी सात दिवस प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर केले तर पेचप्रसंग उद्भवू शकतो, असे चटवाल यांनी स्पष्ट केले.
कच्च्या मालाच्या किमती सातत्याने बदलत असल्याने कोणाकडेही फार मोठा साठा उपलब्ध नाही. तसेच कच्च्या मालाच्या किमती वाढल्या असल्याने औषधांच्या किंमती 25 ते 30 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता अंतस्थ सूत्रांनी दिली.




