“भाजपच्या चुकीमुळे लातूरच्या जनतेला नाहक त्रास होऊ नये, येत्या काळात उत्तर देऊ”; लातुर बंदची हाक देताच अमित देशमुखांचे आवाहन

Amit Deshmukh | भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुखांसंदर्भात केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. ‘भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, ‘असं रवींद्र चव्हाण यांनी भाष्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
याच दरम्यान, लातूरमधील विविध सामाजिक संघटना आणि व्यापारी संघटना यांनी एकत्र येत आज (7 जानेवारी) लातूर बंदचे आवाहन केलं होतं. मात्र बंदची ही हाक दिलेली असतानाच विलासरावांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांनी पोस्ट शेअर करत लातूर बंद न करण्याचे आवाहन केलं आहे.
अमित देशमुख यांची पोस्ट
“परवा लातूर येथे आयोजित भाजपाच्या प्रचारसभेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांबद्दल कोणतेही कारण नसताना अत्यंत दुर्दैवी विधान केले. या विधानाचा मी तीव्र निषेध करतो. या वक्तव्यामुळे तमाम लातूरकरांच्या भावना दुखावल्या असून, लातूरसह महाराष्ट्रातील अनेक भागांतून याचा निषेध नोंदवला जात आहे.
मला असे समजले आहे की त्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी लातूरकरांनी उद्या लातूर बंदची हाक दिली आहे. मात्र भाजपच्या चुकीमुळे लातूरच्या जनतेला नाहक त्रास होऊ नये, असे मला मनापासून वाटते. आदरणीय साहेबांच्या विचारांवर ठाम राहून आपले कार्य आपण सुरू ठेवले पाहिजे.
परवा लातूर येथे आयोजित भाजपाच्या प्रचारसभेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांबद्दल कोणतेही कारण नसताना अत्यंत दुर्दैवी विधान केले. या विधानाचा मी तीव्र निषेध करतो. या वक्तव्यामुळे तमाम लातूरकरांच्या भावना दुखावल्या असून, लातूरसह…
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) January 6, 2026
“त्यामुळे उद्याचा बंद न करता, लोकशाहीतील योग्य आणि सुसंस्कृत मार्गाने आपण त्यांना येत्या काळात उत्तर देऊ. जेणेकरून भविष्यात कोणीही माननिय विलासराव देशमुख साहेबांचा किंवा लातूरकरांचा अपमान करण्याचे धाडस करणार नाही. हे माझे लातूरकरांसाठी नम्र आवाहन आहे,” असं अमित देशमुख यांनी म्हटलं आहे,” अशा शब्दात अमित देशमुख यांनी लातूरकरांना आवाहन केलं आहे. Amit Deshmukh |
नेमका वाद काय?
लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने जिल्ह्याच्या राजकारणातून संताप व्यक्त केला जाऊ लागला. “भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिल्यास विलासरावांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील असा विश्वास वाटतोय,” असं वक्तव्य चव्हाण यांनी केल्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. Amit Deshmukh |
यासंदर्भात विलासराव देशमुखांचे पुत्र अमित देशमुख, अभिनेता रितेश देशमुख यांनी प्रतिक्रिया देत सदर विधानाचा निषेध केला. त्यानंतर चव्हाण यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली. त्यानंतर लातूर बंदची हाक देण्यात आली आहे. आज फडणवीसांची जाहीर सभा असतानाच ही हाक देण्यात आल्याने शहरातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. त्याचदरम्यान, अमित देशमुख यांनी लातूर बंद न करण्याचे आवाहन विलासराव यांच्या समर्थकांना केलं. Amit Deshmukh |
हेही वाचा:





