पुणे | कोकणवासीयांनी केली लाल परीला गर्दी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसह अन्य प्रवाशांची आज सकाळपासून स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशनसह पिंपरी-चिंचवड एसटी स्थानकांवर गर्दी वाढली.
त्यामुळे सकाळपासून कोकणात गाड्या भरून जात होत्या. यंदाही कोकणात जाण्यासाठी ग्रुप बुकिंग आणि आरक्षणाद्वारे २९७ बस बुक करण्यात आल्या आहेत. कोकणसाठी पुण्यातून गुरुवारी १६१ गाड्या सोडण्यात आल्या, तर शुक्रवारी ७५ बस सोडण्यात येणार असल्याची माहिती पुणे एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग सुरू असताना एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आणि प्रवाशांसमोर कोकणात जायचे कसे, असा प्रश्न उभा राहिला. दोन दिवसात काही प्रवाशांना आर्थिक फटका सहन करून प्रवास करावा लागला.
मात्र, दि. ५ सप्टेंबरपासून मोठ्या प्रमाणात कोकणात जाण्यासाठी बुकिंग झाले होते. त्यामुळे संप मिटला नाही तर एसटीला आर्थिक फटका बसण्याबरोबरच प्रवाशांचेही हाल होण्याची भीती होती. मात्र, बुधवारी (दि. ४) रात्री संपावर तोडगा निघाला आणि आज सकाळपासून एसटीची चाके पुन्हा सुसाट धावू लागली.
स्वारगेट, वल्लभनगर आगारांतून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत १६१ बस सुटल्या, तर शुक्रवारी या दोन्ही आगारांमधून ७५ बस, अशा एकूण तीन दिवसांत २९७ बस कोकण भागात जाणार आहेत. प्रवाशांनी आरक्षण आणि बुकिंग केले आहे, त्याद्वारे एसटीला प्रतिबस ४० हजार म्हणजेच जवळपास १ कोटी १६ लाखांचा महसूल मिळाला आहे. – प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक





